आम्ही काय करावे?

“आम्ही काय करावे?” या प्रश्नाला गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे अगदी अचूक सांगायचं झालं तर “संजू” नामक एका चित्रपटाच्या पडद्यावर येऊन झळकल्यापासून खूप उधाण आलंय. चर्चेच्या माध्यमातून, उपदेशांच्या माध्यमातून, आव्हानांच्या माध्यमातून आणि मतप्रदर्शनाच्या [अत्यल्प प्रमाणात] माध्यमातून. काही जण चित्रपट या माध्यमाच्या दृष्टीनं, काही नैतिकतेच्या दृष्टीनं, काही चाहत्यांच्या दृष्टीनं, काही भ्रामक [आम्हाला सगळंच कळतं, हा भ्रम] कल्पनांच्या दृष्टीनं का होईना पण व्यक्त होत आहेत. हा सिनेमा पहावा आणि पाहू नये अशा टोकाच्या भूमिका असलेले दोन भिन्न मतप्रवाह आजूबाजूला दिसत आहेत. 
ही घटना ताजी असतानाच आज वर्तमानपत्रात “डीएसके वरील धड्याचे करायचे काय?” या शीर्षकाखाली एक बातमी आली. “डीएसके” गेल्या ३५-४० वर्षांत सुप्रसिद्ध या पातळीवर आणि गेल्या ६-८ महिन्यांत कुप्रसिद्ध या पातळीवर चर्चेत असलेलं एक नाव. वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात “यशोगाथा” या पुस्तकात वास्तू उद्योगातील अग्रणी “डीएसके” यांच्यावर एक प्रकरण आहे म्हणे..! तर हे प्रकरण कसं शिकवायचं तरी कसं असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे म्हणे..! 
या दोन्ही प्रकरणांमध्ये चर्चा करण्यासाठी अनेक मुद्दे निघतील, मात्र मला त्यात एक साम्य दिसते आहे. ते म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी पुढच्या पिढीला काय सांगायचं आणि कसं सांगायचं? हा असा प्रश्न पडण्याच्या मुळाशी जावं लागेल. “माझं मूल आता मोठं झालंय. माझ्या परवानगीशिवाय ते काहीही करू शकतं. कारण त्याच्या/तिच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि कायद्याने तो/ती सज्ञान आहे. पण मुलं कितीही मोठी झाली तरी आई-बापाला काळजी असतेच हो. काय परिणाम होईल माझ्या मुलांवर असले चित्रपट पाहून? अशा माणसाबद्दल वाचून? इत्यादि. इत्यादि. इत्यादि. ही आणि अशी अनेक वाक्य अनेक चिंतातुर पालकांकडून ऐकायला मिळत आहेत. आणि आता या चिंतातुर लोकांमध्ये शिक्षकांची भर पडताना दिसते आहे.        
एखादा चित्रपट पाहून किंवा एखादे पुस्तक वाचून एखाद्या व्यक्तीवर त्याचा इतका प्रभाव पडू शकतो का, की त्या व्यक्तीचं आयुष्य बदलून जाईल? तर उत्तर आहे ‘हो, असं घडणं शक्य आहे.’ मात्र त्याकरिता तो चित्रपट किंवा ते पुस्तक इतकं प्रभावी असलं पाहिजे की त्याला त्या व्यक्तीच्या मनाचा अथवा बुद्धीचा ताबा मिळवला पाहिजे. अन्यथा दुसरी शक्यता म्हणजे तो चित्रपट किंवा ते पुस्तक प्रभावी नसून; ह्या व्यक्तीच्या मनाची अथवा बुद्धीची अवस्था बिकट आहे. आणि अशी परिस्थिती [दोन्ही प्रकारची] असण्याची कारणं ही अत्यंत खरी असू शकतात.
ह्यामध्ये जे सगळे चिंतातुर आहेत, त्यांना चिंता नेमकी कशाची वाटतीय? ‘सिनेमा पाहून किंवा पुस्तक वाचून आपली मुलं बिघडणार तर नाहीत ना?’ की ‘आपली मुलं बिघडणार तर नाहीत ना?’ कारण मुलांना “बिघडवायला” या दोन माध्यमांखेरीज अनेक माध्यमे आज उपलब्ध आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या जगण्याचा वेग. व्हॉटसऍप हे त्याचं उत्तम उदाहरण. एखादा मेसेज आला की तो खरा आहे की नाही याची खातरजमा न करता तो पटकन पुढे पाठवणे/फॉरवर्ड करणे, हे एखाद्या राष्ट्रीय कर्तव्याइतके महत्वाचे असल्यासारखे लोक ते करत असतात. आणि ते केल्यानंतर आपण काहीतरी महत्वाचे काम केले आहे अशा एका आभासी समाधानाचे बळी ठरतात. एखादी गोष्ट पाहून, वाचून, ऐकून मुलं बिघडतील इतकी त्यांची मनं आणि बुद्धी कमकुवत असेल तर जबाबदार कोण? अर्थात, पालक आणि शिक्षकसुद्धा !
त्याच अनुषंगाने काही मनात आलेले मुद्दे :
आपण आपल्या मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखतो का? का रोखतो? कारण एकतर मला त्या प्रश्नांची उत्तरं माहिती नसतात किंवा द्यायची नसतात किंवा कशी द्यायची हे कळत नसतं. मग पालक किंवा शिक्षक म्हणून, माझ्या या वृत्तीचा परिणाम हा, अशीच कमकुवत मनाची/बुद्धीची मुले तयार होण्याकडे नसेल का?
आपण एखाद्या गोष्टीविषयी/घटनेविषयी मत तयार करण्याआधी प्रत्येक वेळी स्वतः अधिक माहिती घेतो का? त्या घटनेचा/गोष्टीचा इतिहासात काही संदर्भ आहे कि नाही याचा अभ्यास करतो का? नुसताच अभ्यास करतो की त्यावर विचार देखील करतो? आणि जर आपणच हे करत नसू तर मग आपल्या मुलांना याची सवय कशी लागणार? सत्यासत्यता पडताळण्याइतकीसुद्धा वेळ नसलेल्या वेगवान आयुष्याचे ध्येय नक्की काय असावे? एखादी माहिती ऐकायची/वाचायची/बघायची आणि मिळालेल्या माहितीतील विचार उचलून त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया देऊन मोकळं व्हायचं, या पद्धतीमुळे हलक्या कानांचे [पर्यायाने हिंसक] नागरिक आपण तयार करतो आहोत का?          
वरील बातमीत “डीएसकें वरील पुस्तकातील प्रकरण मुलांना कसे शिकवायचे? मुलांच्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यायची?” या प्रश्नांवर “विद्यार्थ्यांना हे प्रकरण शिकवले जाऊच नये व त्याबाबत प्रश्नही विचारले जाऊ नयेत” अशी भूमिका शिक्षकांनी/प्राध्यापकांनी घेतली आहे. ही भूमिका किती योग्य आहे? एखाद्या गोष्टीचा सांगोपांग विचार करायला आपण विद्यार्थ्यांना कधी शिकवणारच नाही का? डीएसके या माणसाला त्याच्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा झालीच पाहिजे, पण म्हणून एक ठराविक काळ का होईना त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून, मध्यमवर्गीयांच्या माध्यमातून कर्जरोखे, मुदतठेवी यांच्या सहाय्याने ज्या पद्धतीने स्वतःसाठी भांडवल उभे केले आणि बँकापेक्षा अधिक व्याज देऊन सामान्य माणसाला उत्पन्नाचा एक विश्वासू मार्ग तयार केला होता , त्याकडे दुर्लक्ष करुन चालेल का? त्या विश्वासाच्या मार्गावरून चालताना, वाटेत लागणारे लालसेचे, हव्यासाचे शॉर्टकट्स त्यांनी स्वीकारले म्हणून आज त्यांची आणि त्यामुळे अनेक जणांची वाताहत झाली. पण त्यामुळे विश्वासाच्या मार्गाचं जे उदाहरण आहे किंवा जो आदर्श आहे तो चुकीचा कसा ठरतो? केवळ या कारणासाठी त्या उदाहरणाचं शिक्षण घ्यायचं नाही? आणि आत्ता जे आजूबाजूला चाललेलं आहे ते न कळण्याइतके वाणिज्य शाखेचे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी खुळे नाहीत. उलट विद्यार्थ्यांनी जर म्हटले की “डीएसके हा लबाड, फसवा, खोटा मनुष्य आहे, त्याविषयी आम्हाला काहीही शिकायचे नाही”, तर शिक्षकांनी त्यांना समजावलं पाहिजे की, त्याने उद्योजक म्हणून काय चांगलं काम केलं? त्याच्या कुठल्या निती कशामुळे यशस्वी झाल्या? ह्याचा अभ्यास करताना, तो कुठे फसला?, त्याचं काय चुकलं?, ह्याचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा. काय करायचं ह्याबरोबर काय नाही करायचं हे पण शिकलं [आणि शिकवलं] पाहिजेच ना? नाहीतर इतिहास काय फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी शिकायचा?
एकदा एका कीर्तनामध्ये बोलताना श्री. चारुदत्त आफळे [आफळेबुवा] म्हणाले, “सध्या आपली सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य कमी होत चाललेलं आहे.” मला ते अगदी मनोमन पटलं. एखाद्या कलेच्या/विद्येच्या/शास्त्राच्या शिक्षणासाठी विद्यार्थी गेला असता, त्याचे पालक शिक्षण सुरु होण्यापूर्वी शिक्षकांना विचारतात की माझा मुलगा/मुलगी प्रसिद्ध कधी होईल? मला जर एखाद्या विद्येत, कलेत अथवा शास्त्रात पारंगत/सामर्थ्यवान व्हायचे असेल तर मला व्यवस्थित, आवश्यक तेवढी उपासना करावी लागेल आणि ती उपासना यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी माझ्यात पुरेसे सामर्थ्य निर्माण करायला हवे, याची जाणीव [उपदेश नव्हे]  पालक म्हणून आपल्या पाल्याला आपण करून  दिली पाहिजे.
आपण जे शिकतो आहोत, ते का शिकतो आहोत? याचं भान असलं तर शिक्षण कंटाळवाणं होणार नाही. त्यामुळे हे भान शालेय वयापासून विद्यार्थ्यांमध्ये जागवलं पाहिजे. हे भान जागवण्याचं काम जितकं शिक्षकाचं आहे तितकंच ते पालकांचं सुद्धा आहे. या भानामुळे विद्यार्थी म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून विचारांची उत्तम बैठक असलेल्या व्यक्ती समाजात असतील. उत्तम विचारांची बैठक असलेला माणूस, मनातील संवेदनशीलतेचा अर्क आणि तल्लख बुद्धीचा तर्क याची व्यवस्थित सांगड घालू शकतो. याचं मला वाटणारं उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे विंदा करंदीकरांची एक कविता. 

     एका प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता मी इथवर येऊन पोहोचलो. मी अजूनतरी कोणाचा पालक नाही; परंतू शिक्षक म्हणून मला कुठल्या मार्गावरून चालायचे आहे, हे मात्र मी निश्चित ठरवले आहे. बाकी माझे शिक्षण चालू रहाणारच आहे.       

© अमृत सामक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *