सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर आणि विशेषकरुन रो. वृंदा वाळिंबे, रो. अजय गोडबोले यांचे विशेष आभार आणि अभिनंदन. आभार आणि अभिनंदन दोन कारणांसाठी – एक म्हणजे त्यांनी त्यांच्या क्लबतर्फे गरजूंना नुसत्या वस्तू न पुरवता; त्याचबरोबर सेवाही पुरवल्या. आणि त्या सेवांमध्ये कला शिक्षणाचा समावेश केला. आणि अर्थातच दुसरं कारण म्हणजे त्या प्रकल्पामध्ये त्यांनी मला सहभागाची संधी दिल्याबद्दल. आजवर अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असे प्रकल्प राबविले गेले आहेत आणि जात आहेत. मात्र त्यामध्ये कला शिक्षण देणाऱ्या प्रकल्पाची कमतरता तीव्रतेने जाणवते आहे. खरंतर कला शिक्षण हे एकूणच मानवी जीवनाला समृद्ध करणारे असते. आणि विशेषकरुन माणसाच्या अभिव्यक्तीला वाट मोकळी करून देण्यासाठी कला शिक्षण हे अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अशा वेळी कला शिक्षणाची योग्य गरज ओळखून ती योग्य त्या ठिकाणी रुजवायला सुरुवात केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन…!!
कला शिक्षण हे जितक्या लहान वयात सुरू होईल तितकं ते चांगलं. सर्वसामान्य मुलांच्या [ज्यांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात अशी काळजी त्यांच्या आजूबाजूचे सर्व लोक घेत असतात] बाबतीत हे कला शिक्षण त्यांच्यापर्यंत शाळा, छंदवर्ग, अतिरिक्त शिकवण्या इ. माध्यमांमधून पोहोचत असते. पण जिथे मूळ शालेय शिक्षण मिळवण्यासाठी ज्या मुला-मुलींना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो अशा गरजू मुला-मुलींबरोबर मला काम करायला मिळालं ह्याचा मला आनंद आणि समाधान आहे. त्या अनुभवाविषयी….
पहिला अनुभव आपटे मूकबधिर विद्यालयाच्या मुला-मुलींचं एक १५ मिनिटांचं नाटुकलं उभं करण्याचा. खरंतर हे काम करणार का? असं मला वृंदाताईनी विचारल्यानंतर मी क्षणाचा विलंब न करता हो असं उत्तर दिलं; मात्र तिथे जाईपर्यंत आणि तिथला कामाचा पहिला दिवस उजाडेपर्यंत माझ्या मनात एक विलक्षण धाकधूक होती. कारण मी मूकबधिर मुलांबरोबर याआधी कधीही काम केलं नव्हतं. मात्र तिथे पोहोचल्याचा दुसऱ्या क्षणापासून मला त्या मुलांनी आपलंस केलं होतं. त्यांच्याकडे मला सांगायला आणि माझ्याशी बोलायला इतकं काही होतं की आमचा पहिला दिवस आनंददायी गप्पा मारण्यात आणि त्यांच्यातल्या प्रत्येकाला काय काय येतं, काय काय विशेष आवडतं हे समजून घेण्यात संपला. त्यांची भाषा मला आणि माझी भाषा त्यांना कळावी म्हणून त्यांच्या एक शिक्षिका तिथे उपस्थित होत्या; पण त्यांच्या उपस्थितीची तांत्रिक गरज तिसऱ्या दिवशी संपलेली होती. मुलांची आणि माझी भाषा एकच झाली होती आणि ती भाषा होती expressions ची अर्थात हावभावाची. गोष्ट समजून घेणे, त्यावर योग्य त्या हालचाली आणि हावभाव करणे आणि ते खोटं न वाटू देता प्रेक्षकाला रंगमंचावर घडत असलेल्या घटनेशी तादात्म्य पावायला लावणे हे नटाचे मुख्य काम. हे काम तर ही मुलं इत्यंभूत करत होतीच, पण जर मला एखादी गोष्ट समजावून सांगताना अडचण येते आहे हे जाणवलं तर चटकन माझ्या मदतीला धावून यायची. ती मुलं माझ्याकडून काही शिकली किंवा नाही याचं उत्तर ती मुलंच देऊ शकतील. मात्र मी त्यांच्याकडून खूप गोष्टी नव्याने शिकलो.
एक छोटीशी घटना सांगतो. मी ज्या गोष्टीवर हे नाटुकलं करत होतो, ती गोष्ट एका आजोबांची आणि नातवाची होती. त्यात नातवाच्या रोलसाठी मी एका मुलाची निवड केली होती. तिसऱ्या दिवशी असं लक्षात आलं की तो मुलगा अपेक्षित reactions तितक्या प्रभावीपणे देऊ शकत नाहीये. आता हे जसं माझ्या आणि इतरांच्या लक्षात आलं तसंच ते त्याच्याही लक्षात आलं. मग तो मला खुणेने थांब म्हणाला. उठला आणि दुसऱ्या एका मुलाकडे जाऊन त्याने खूण केली की हा जास्त छान करेल तो रोल, तुम्ही ह्याला घ्या. असं म्हणून माझ्या पुढच्या वाक्याची वाट न बघता स्वतः त्या मुलाच्या जागेवर थांबून, त्या मुलाला त्याने स्वतःचा रोल करण्यासाठी पाठवून दिलं. अर्थातच नाटुकलं छान झालं. पण या शिबिरात नाटक शिकवता शिकवता माझं पुनर्शिक्षण झालं. “नाटक ही सांघिक कला आहे.” “इतर कोणत्याही घटकांपेक्षा एकूण सादरीकरण महत्त्वाचे असते.” इ. तात्त्विक मुद्दे आचरणात आणले तर त्याचा फायदा कसा होतो याची प्रचिती मला पावलोपावली येत होती. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्या मुलात काही उणीवा आहेत हे माहित्ती असूनसुद्धा त्या उणीवा सुधारण्याची संधी आपल्या मुलाला आणि त्याच्या शिक्षकाला न देता आपल्या मुलाला लवकरात लवकर मेन रोल कसा मिळेल किंवा ज्याला तो मिळालाय त्याला तो का मिळालाय याचं कारण समजावून न घेता फक्त मेन रोलसाठी धडपड करणारे पालक बघितले की प्रश्न पडतो, “इतर प्रशिक्षणापेक्षा आता माणूसकीच्या प्रशिक्षणाची गरज जास्त पडणार का ?” असो. मात्र आपटे मूकबधिरच्या विद्यार्थ्यांसोबत काम करत असताना त्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता. प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थीनी कुठल्या ना कुठल्या बाबतीत पारंगत होते आणि आपण ज्यात पारंगत नाही अशा नव्या गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल होता. Dance करायला त्यांना मनापासून आवडायचं, आणि त्यांच्या आग्रहाखातर नाटुकल्याचा शेवट एका छोट्याशा dance ने केला गेला.
दुसरा अनुभव एकलव्य ट्रस्ट च्या मुलांसाठी घेतलेल्या नाट्यकार्यशाळेचा. वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायकांच्या मुला -मुलींसाठी हा ट्रस्ट काम करतो. त्या मुला -मुलींच्या चांगल्या संगोपनासाठी हा ट्रस्ट झटत असतो. इथे कार्यशाळा घेताना मला फारच गंमत वाटली. इथं वय वर्षे ७ ते १५ या वयोगटातल्या मुला -मुलींचा समावेश होता. इथल्या मुला -मुलींमध्ये ऊर्जेचा धबधबा सतत वाहत असायचा. त्यामुळे इथे जाण्यापूर्वी प्रचंड शारीरिक आणि मानसिक ऊर्जा घेऊनच जायला लागायचं. इथली कार्यशाळा आठवड्यातून २ दिवस, रोज २-२.३० तास, असे ४ आठवडे अशी होती. त्यामुळे मध्ये ६ दिवसांच्या अंतरानंतर मुलं -मुली काम करण्यासाठी खूप उत्सुक असायची. त्यातली सगळ्यात लहान मुलं तर दरवाजापाशी येऊन वाट बघत असायची.
मला इथल्या मुलांमध्ये एक विलक्षण आक्रमकता जाणवली आणि त्यांच्या या आक्रमकतेला योग्य दिशा देण्यासाठी तिथे कला शिक्षणाची अत्यंतिक गरज आहे हे तीव्रपणे जाणवलं. या शिबीरादरम्यान एकदा मी त्या मुला -मुलींना “आनंद” या विषयावर आपापली गोष्ट रचून त्याचं छोटं ५-७ मिनिटांचं सादरीकरण करायला सांगितलं होतं. मुला -मुलींचे ६ गट झाले होते. प्रत्येक गट सादरीकरण करणार होता. त्यातल्या एका गटाने परीक्षेत कॉपी करायला मिळाली, याचा आनंद झाल्याविषयी सादरीकरण केलं. ह्याविषयी त्या गटातल्या मुलांशी बोलल्यानंतर त्यातला एक मुलगा म्हणाला, “जर शिकवलेलं नीट कळलं नसेल आणि अभ्यास झाला नसेल तरी पास तर व्हावंच लागेल ना! मग कॉपी करताना आम्हाला पकडलं नाही याचा आनंद आम्हाला झाला.” पण मग त्याच्या ह्या मुद्द्यावर सर्वांसमक्ष एक खुली चर्चा झाली. एखादी चुकीची गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करणं हे कसं चुकीचंच असतं. हे मुला -मुलींना पटवून सांगण्यापेक्षा त्यांना जाणवून देणं अधिक आवश्यक होतं. कलाशिक्षणामध्ये कलेच्या तांत्रिक शिक्षणाबरोबर “जाणिवांच्या पातळीवर समृद्धता वाढवणं” हे प्रमुख काम असतं आणि प्रशिक्षकाला ते जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक करायला लागतं, असं मला वाटतं. प्रशिक्षकाकडून उपदेश यायला लागले की मूल त्याची दारं बंद करून घेतं; आणि त्याऐवजी माझी चूक किंवा माझं बरोबर हे माझं मला जाणवलं की ती गोष्ट मूल कायमची शिकतं. या प्रक्रियेतून जाताना माझंही खूप शिक्षण नकळतच होत होतं. या सत्रांपैकी १-२ सत्रांना ट्रस्टच्या संचालिका रेणूताई गावस्कर मुद्दाम उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनीसुद्धा चर्चेदरम्यान कलाशिक्षण ही मूलभूत गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
या दोनही शिबीरात काम करायला मला मजा आली याबद्दल तर दुमत नाहीच; पण आधी नमूद केल्याप्रमाणे कलाशिक्षण ही “Long term results” देणारी संकल्पना असूनसुद्धा त्यावर काम झालं पाहिजे याची सूज्ञ जाणीव असलेल्या रो. वृंदा वाळींबे आणि रो. अजय गोडबोले यांच्या प्रयत्नामुळे हे “रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर” या संस्थेच्या माध्यमातून घडू शकलं याचा मला आनंद आहे. असंच छान छान काम मला नेहमी करता यावं, यासाठी मी मनोमन प्रार्थना करतो आणि RCPS, Pune चे पुन्हा एकदा आभार मानतो.
©अमृत सामक
अमृतदादा, विलक्षण अनुभव जमलं तर विडीओ पाहायला आवडेल