“ए दादा, तुम्ही तुमच्या नाटकाचं नाव THE BALANCING ACT असं का ठेवलंय?” नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांशी होणारा संवाद ही मला नेहमीच प्रयोगाइतकीच महत्वाची वाटणारी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी केलेलं कौतुक जसं कोणत्याही कलाकाराला आनंद देणारं असतं तसंच ते माझ्याही बाबतीत आहे. मात्र त्या कौतुकापलीकडे जाऊन हा संवाद मला लॉटरी सारखाच वाटतो. दरवेळी तुम्हाला लॉटरी लागेलंच असं नक्की सांगता येत नाही. अगदी कधीतरीच एखाद्यावेळी नशीब चमकावं आणि लॉटरी लागावी तसं कधीतरीच एखाद्यावेळी या संवादातून काहीतरी मस्त गवसतं. त्यामुळे ह्या संवादाचा प्रयत्न सोडून चालत नाही. बऱ्याचदा ओळखीचे (खास करून मित्र किंवा नातेवाईक) प्रेक्षक असतील तर या संवादात “छान! मस्त! भारी करता तुम्ही” या पलीकडे फारसं काही हाती लागत नाही. एखाद्या वेळी तर प्रयोग चांगला झाला नाही हे माहीत असूनही, कळत असूनही ही अशी “स्तुतीसुमनं” निमूटपणे ऐकून घ्यावी लागतात. अशा वेळी प्रेक्षकांना (अशा) टाळणं ही प्रमुख जबाबदारी होऊन बसते. काही वेळा प्रेक्षक अनोळखी असूनसुद्धा अशी परिस्थिती अनुभवास येतेच. अन्यथा एकदम दुसरं टोक म्हणजे तुम्ही केलेलं सगळंच कसं चूक आहे हे सांगणारे प्रेक्षक. त्यामुळे “प्रेक्षक कसा असावा?” या प्रश्नावर उत्तर शोधताना मला कायमच प्रेक्षक हा अतिशय प्रगल्भ आणि समृद्ध असावा असं वाटायचं. पण गेल्या वर्षभरापासून माझ्या या उत्तरात बदल झालाय. कसा ते सांगतो. त्याआधी थोडसं द बॅलन्सिंग ऍक्ट या नाटकाविषयी….
द बॅलन्सिंग ऍक्ट हे नाटक “violance as seen and experienced by young children” या विषयाभोवती फिरणारं नाटक आहे. लहान मुलांची ‘हिंसा’ या क्रियेशी ओळख कशी होते, त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांना हिंसा अनुभवास कशी येते या प्रश्नांकडे आणि त्यांच्या उत्तरांकडे बघण्याची संधी या नाटकात निर्माण केली गेली आहे. विदुषकासारखी लाल रंगाची नाकं लावून समोर येणारी पात्र हे लहान मुलांसाठी आकर्षणाचा विषय असतंच, पण जिबरीश भाषेत होणारं सादरीकरण हे त्यांना त्यापेक्षा जास्त आवडतं. आपल्याला माहित नसलेली भाषा आपल्याला कळते याचं नाविन्य त्यांना आनंद देणारं असतं. पण हे नाटक जितकं मुलांसाठी आहे तितकंच ते मोठ्यांसाठी सुद्धा आहे. “प्रत्येकात एक मूल दडलेलं असतं” अशा कविकल्पनेपेक्षा आपल्या स्वत:च्याच बालपण ते मोठेपण या झालेल्या प्रवासाला पुन्हा भेट देण्याच्या दृष्टीकोनातून मोठी माणसे ह्या नाटकाचा अनुभव घेताना दिसून येतात.
या नाटकाच्या बांधणीसाठी आणि प्रभावी सादरीकरणासाठी आम्हा नटांच्या वैयक्तिक अनुभवविश्वाचा फायदा कसा होऊ शकतो, हे प्रसादने (प्रसाद वनारसे) दिग्दर्शक म्हणून आम्हाला अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने समजावून दिलं. त्यामुळे या नाटकातल्या घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात गंमत, धमाल, मज्जा जरी असली तरी सादरीकरणाची भाषा आणि त्याचं माध्यम याचं आव्हान आमच्या सर्वांसमोर आहे याची जाणीव आम्हाला झाली. त्यानंतर दोन महिन्यांच्या सरावानंतर हे नाटक उभं राहिलं. हा सराव शारीरिकदृष्ट्या अत्यंत दमवणारा असला तरी नविन गोष्टी शिकवणारा असल्यामुळे त्रासदायक नव्हता. अत्यंत गांभीर्याने होणाऱ्या या सरावांमध्ये कधीकधी (विशेषतः दिग्दर्शकाच्या गैरहजेरीत आणि कधीतरी दिग्दर्शकाच्या उपस्थितीत सुद्धा) होणारी मजा-मस्ती एक वेगळी उर्जा देणारी असायची. अदिती वेंकटेश्वरन, निखिल गाडगीळ, अनुष्का वझे, तन्मयी अंबेकर, ऋजुता सोमण, झुबीन खेतानी, इरा जोशी, मधुरा पेंडसे, समीर दुबळे, प्रसाद वनारसे (दिग्दर्शक) ही या उर्जेचा अखंड स्रोत असलेली मंडळी; म्हणजे अर्थातच आमचा संघ. हा या नाटकाचा तिसरा संघ. यापूर्वी या नाटकाचे प्रयोग दोन संघांसोबत झालेले आहेत. या दोन्ही संघांमध्ये माझा सहभाग नसल्यामुळे मी मात्र या तिसऱ्या संघासोबत केलेल्या प्रयोगांच्या अनुभवाविषयी सांगणार आहे.
तर आजवर या नाटकाचे प्रयोग प्रामुख्याने लहान मुलांसमोर झालेले आहेत. विशेषतः शाळांमध्ये. मात्र आधी उल्लेख केल्याप्रमाणे खास बालकांसाठी असं ते नाटक नसल्यामुळे काही प्रयोग हे शाळांबाहेर, सर्वांसाठी सुद्धा झालेले आहेत. पण त्यात मात्र प्रेक्षक म्हणून मोठ्या प्रमाणात मुलांचा समावेश होता. आणि त्यामुळे मला या अशा प्रयोगांनंतरच्या प्रेक्षक संवादांविषयी काही आठवणी मनात राहिल्या आहेत.
त्यापैकी एक, एका शाळेतली. त्या शाळेतल्या प्रयोगानंतर सर्व मुलांशी एकत्रितपणे, अनौपचारिक पद्धतीने काही प्रश्न विचारून, काही प्रश्नांची उत्तर देऊन सत्र संपलं. त्यानंतर ते सगळे विद्यार्थी-विद्यार्थीनी शाळेच्या शिस्तीप्रमाणे एक एक रांग करून आपापल्या वर्गात निघाले होते. तेवढ्यात त्यातला एक विद्यार्थी रांग मोडून माझ्याकडे धावत आला. ते पाहून त्याच्या मित्राने सुद्धा तातडीने हे धारिष्ट्य केले. ते दोघे म्हणाले, “मस्त झालं नाटक, मज्जा आली” आणि त्यानंतर hi five करून ते निघणार तेवढ्यात त्यातल्या एका मुलाने विचारलं, “ए दादा, तुम्ही तुमच्या नाटकाचं नाव THE BALANCING ACT असं का ठेवलंय?” मी काही बोलायच्या आत दुसऱ्या मुलाने उत्तर दिलं, “ कारण आपल्या बरोबर चांगलं आणि वाईट दोन्ही घडत असतं आणि त्यात आपल्याला tears आणि laughter चा balance करता यायला हवा, म्हणून! बरोबर ना?” इतकंच. ह्या संवादानंतर पुन्हा hi five करून ते निघून गेले.
दुसरी आठवण. ह्या नाटकात child abuse बद्दलचा एक प्रसंग प्रतीकात्मक स्वरूपात दाखवला आहे. त्या प्रसंगाविषयी एका मुलीने विचारलं, “तू त्या छोट्या मुलीला kidnap करतोस ना?” तर दुसरी एक मुलगी म्हणाली, “मला नाही आवडला तो सीन” तिसरी आठवण. एका स्वयंसेवी संस्थेसाठी (NGO) हा प्रयोग केला होता. तेव्हा नाटकात एका प्रसंगी आई-बाबा मुलांसमोर भांडत असताना समोर बसलेली मुले हसू लागली. नंतर त्या संस्थेतल्या लोकांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की हे असं प्रसंग त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहेत, त्यामुळे त्यांना त्याचं गांभीर्य वाटत नसावं.
आणखी एक म्हणजे “अहो आता तुमचा प्रयोग पाहून आठ दिवस झाले. पण अजूनही आमचा मुलगा/मुलगी तुमच्या त्या जिबरीश भाषेत माझ्याशी बोलतोय/बोलतेय. जरा आम्हाला पण शिकवा ना ती भाषा.” असं आम्हाला फोन करून (कौतुकानं) सांगणारे पालक.
ही गंभीर प्रसंगाला हसणारी, अशी प्रतिक्रिया देणारी मुलं किंवा नाटकात लपाछपीचा प्रसंग सुरु झाल्यावर, जणू काही आपण त्या प्रसंगाचा भाग आहोत अशी व्यक्त होणारी मुलं, आम्हाला हा सीन नाही आवडला किंवा तो खूप आवडला असं अत्यंत स्पष्टपणे सांगणारी मुलं आणि जिबरीश भाषेतले आपल्याला आवडलेले शब्द टिपून नाटकानंतर ते शब्द उच्चारत परत जाणारी मुलं या सर्व प्रकारच्या प्रेक्षकांमधला समान धागा म्हणजे निरागसपणा. माझ्या सुरुवातीला नमूद केलेल्या प्रश्नाचं बदलेलं उत्तरसुद्धा हेच आहे. प्रेक्षकाला या मुलांसारखं निरागसपणे आपापल्या भावविश्वाशी आणि अनुभवांशी प्रामाणिक राहून कलाकृतीकडे पहाता आलं पाहिजे असं वाटतं. तसं शक्य झालं तर त्यांची प्रतिक्रिया ही ‘कुणीतरी काहीतरी म्हणेल’ किंवा ‘कुणालातरी काहीतरी वाटेल’ या असल्या प्रभावांखाली न असता खरी असेल. आणि कदाचित अशा प्रतिक्रिया चांगल्या कलाकृती निर्माण होण्यासाठी मदत करतील असं मला वाटतं.
जुलै २०१७ मध्ये स्पेन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात THE BALANCING ACT (द बॅलन्सिंग ऍक्ट) या नाटकाची निवड झाली आणि आमचा आनंद शिगेला पोहोचला. त्यानिमित्ताने गेल्या वर्षभरात झालेल्या या नाटकांच्या सर्व प्रयोगांची आठवण झाली आणि म्हणूनच हा नोंदप्रपंच…!!!
© अमृत सामक
Interested
I want to part of rangabhasha
I want to part of rangabhasha
It’s good to read