“मी पालक म्हणून कसा आहे?” असा विषय आत्मचिंतनपर लेखनासाठी जेव्हा मिळाला तेव्हा खरंतर मजा वाटली. स्व-संवाद ही माझी अतिशय मनापासून आवडती गोष्ट; त्यामुळे आनंद होणं स्वाभाविक होतं.
तर तांत्रिकदृष्टया खरंतर मी कुणाचाही पालक नाही (म्हणजे आई-वडील या अर्थी) परंतु “तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मुलांबरोबर काम करत असताना त्या वेळी त्यांचं पालकत्व तुमच्याकडे असते, त्यावेळी तुम्ही पालक म्हणून स्वतःकडे कसे बघता?” हे जाणून घ्यायला आवडेल असं मला सांगण्यात आलं आणि मग ह्या स्व-संवादाला सुरूवात झाली.
खरंतर, मी पालक म्हणून कसा आहे? ह्याचं उत्तर माझ्या पाल्यांनी देणं जास्त योग्य राहील. त्यामुळे जरी हे आत्मचिंतन असलं तरीही ह्यामध्ये माझ्या पाल्यांकडून वेळोवेळी मिळालेल्या काही प्रतिक्रियांची नोंद (अर्थातच माझ्या आकलनातून झालेल्या स्वतःच्या नोंदींसोबत)असणार आहे.
माझी पालकत्वाची संकल्पना आणि त्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी ही मूलतः तीन प्रकारच्या अनुभवातून ठरली आहे.१. माझ्या बाबतीत माझ्या स्वतःच्या पालकांची वर्तणूक २. माझ्या बाबतीत (माझे अर्धवेळ पालकत्व मिळालेल्या) माझ्या विविध शिक्षकांची वर्तणूक३. लहान वयात आणि सध्या देखील माझ्या आजूबाजूच्या (पालकांच्या आणि शिक्षकांच्या बाबतीतल्या) ऐकीव माहितीतून
त्यातल्या काही मनात कोरल्या गेलेल्या गोष्टी :-
प्रसंग पहिला : मी पाच सहा वर्षांचा असेन. घरात काही कार्यक्रमानिमित्त सगळे नातेवाईक जमले होते. मी लहान म्हणून सगळ्यांना माझ्याशी खेळायचं होतं. पण मला मोकळेपणे माझं माझं खेळायचं होतं. ह्या नातेवाईकांमध्ये एक मावशी होती; जी सारखी मला मस्करी म्हणून चिडवत होती आणि ते करता करता तिच्या एका कृत्यामुळे मला माझा सर्वांसमक्ष अपमान झाल्यासारखं वाटलं आणि राग येऊन मी माझ्या हातातल्या खेळण्यातल्या बंदुकीने त्या मावशीकडे मारा केला आणि त्यामध्ये तिचा डोळा थोडक्यात वाचला. त्यावेळी ती मावशी, तिचे यजमान, इतर एक दोन नातेवाईक माझ्या अंगावर ओरडत होते, मला रागवत होते. अर्थातच मी रडत होतो. कुणीतरी एक दोन धपाटे माझ्या पाठीत घातले. त्या वेळी माझे आई-बाबा शांत होते. त्यांनी ना कुणा नातेवाईकाला अडवलं, ना मला रागे भरले. ह्या प्रसंगानंतर मला त्यावेळी माझी बाजू घेतली नाही म्हणून माझ्या आई बाबांचा राग आला होता; पण त्यानंतर आईने मला सांगितलेलं मला अजून आठवतंय. आई म्हणाली होती, “चूक तुम्हा दोघांचीही होती. पण तुला कितीही राग आला असला तरीही तू तिला ‘मारायला’ नको होतं.” (त्यावेळी ते मला पटलं नसलं तरीही) हे असं सांगणं मात्र एकदा नव्हतं. तर अशा काही इतर (अनेक) प्रसंगांत न कंटाळता संयमीपणे ती दरवेळी सांगत राहिली. पालक म्हणून हा आईकडे असलेला संयम मी नक्की शिकलो आणि आवर्जून स्वतःला सतत त्याची आठवण करून देत असतो.
प्रसंग दुसरा :मी इयत्ता आठवीत होतो. इयत्ता आठवीपासून आमच्या शाळेत vocational training चा पर्याय होता, तो मी निवडला होता. हा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना H तुकडी मिळायची. आणि H तुकडी ही ढ मुलांची तुकडी म्हणून (कु)प्रसिद्ध होती. काही शिक्षक ह्या बाबतीत पूर्वग्रहदूषितच होते. माझा गणित विषयात एरवी आनंदच होता; मात्र एका मित्राने मला थोडी गोडी वाटेल असं काहीसं वातावरण त्यावेळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी प्रत्येक धड्याच्या खाली A B C D ह्या चार गटात चढत्या क्रमाने अवघड होत जाणारी गणितं सोडवायला दिलेली असायची. एकदा मी D गटातलं एक गणित सुटत नाही म्हणून बाईंना विचारायला शिक्षक खोलीत गेलो असता; बाईंनी माझ्याकडे पाहून तू तर H तुकडीत आहेस ना मग तुला काय करायचं आहे D गटातलं गणित सोडवून? असा प्रश्न करून मला परत पाठवलं. त्या क्षणी झालेली माझी मनोवस्था मी आजतागायत विसरू शकत नाही. ह्या सारख्या अपमानास्पद प्रसंगांतून मी शिक्षक-पालक म्हणून कसं नक्की वागायचं नाही हे शिकलो.
प्रसंग तिसरा :खरं म्हणजे हा प्रसंग नव्हे; तर हा सहा वर्षांचा कालावधी आहे. इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी. १९९३ ते १९९८. आमच्या शाळेतले श्री. रमेश परचुरे सर… ह्यांच्याइतका शांत मास्तर मी आजतागायत पाहिलेला नाही. शांत म्हणजे गप्प नव्हे. अत्यंत कृतीशील परंतू सर्व परिस्थितीत शांत राहणारे सर. त्यांना मी कधीच कुणावरच रागावताना पाहिलं नाही. आजही सर भेटले की त्याच मृदू आवाजात बोलतात. तो मृदू आवाज घेता आला नाही ही कायमची खंत आहे, पण त्यांचं शांतपणे परिस्थिती हाताळणं मात्र गेल्या १५ वर्षांत, दोन अपवादात्मक प्रसंग सोडले तर पूर्णपणे अंगिकारण्याचा प्रयत्न राहिला आहे.
प्रसंग चौथा :माझ्या जवळपास सगळ्या मित्रांना त्यांच्या आई बाबांना (खासकरून बाबांना) घाबरताना मी पाहिलं आहे. आमच्या घरात आई बाबांची भीती वाटली असा क्षण गेल्या ३७ वर्षांत मला आठवत नाही. त्याचा खरंतर त्रास झाला असेल तर तो माझ्या आई बाबांना आणि त्या त्रासाचा सगळा दोष माझा. पण आपले आई बाबा आपले सवंगडी (नुसतं नावाला नाही तर प्रत्यक्षात)आहेत असं नैसर्गिक वातावरण किती पोषक असतं ह्याचा नुसता अनुभव नाही तर साक्षात अनुभूती आहे. त्यामुळे तो गुण अंगिकारण्यापेक्षा आपोआप अंगीभूत झाला.
प्रसंग पाचवा :माझ्या एका नाट्यकार्यशाळेत एक मुलगी आली होती. खरंतर तिला पाठवलं होतं तिच्या आई बाबांनी. आल्या दिवसापासून ती शांत बसून राहायची, कुठल्याही activity मध्ये भाग घ्यायची नाही. मला वाटलं अबोल असेल एखाद दोन दिवसांत होईल सगळं नीट. पण ती पाचव्या दिवशी पण तशीच होती. म्हणून मग मी तिला विचारलं तर कळलं की तिला नाटक करायला अजिबात आवडत नाही. आई बाबांना वाटतंय म्हणून ती इथे आहे. आई-बाबांशी बोललो तर ते म्हणाले,”एकतर आमच्या दोघांनाही नाटकाची खूप आवड आहे. पण नोकरीच्या धबडग्यात सगळी आवड मागे पडली. त्यामुळे तिने तरी नाटकात जावं अशी आमची इच्छा आहे.” हे आई बाबा हट्टीच होते. मग पुढच्या दिवशी तिला विचारलं काय करायला आवडतं? तर ती उत्तरली,”चित्र” कागद आणि रंग आणून दिले. तिचं ती चित्रं काढत बसायची. ती आनंदात होती म्हणून आम्ही पण होतो. शिबीराचा आठवा दिवस असेल. नाटुकलं उभं करण्याची तयारी सुरू होती, बहुधा ती इतके दिवस चित्रं काढता काढता ऐकत होती. मध्येच येऊन ती आंम्हाला म्हणाली,” मी ह्या नाटकाच्या set चं चित्रं काढू का?” होकार मिळताच तिने अतिशय छान दोन चित्रं काढली ‘एका खोलीचं’ आणि ‘एका बागेचं’. ही दोन्ही चित्रं नाटकाचं नेपथ्य कसं असावं हे दर्शविणारी होती. त्या मुलीनं आमच्या त्या शिबीराच्या नाटुकल्यात (स्वेच्छेनं) एक छोटीशी भूमिकापण केली. तिच्या आई बाबांना आनंद झाला ही गोष्ट माझ्यासाठी फार दुय्यम होती. महत्वाचं होतं तिला जे मनापासून हवं होतं ते करायला मिळणं. आणि ते झाल्यामुळे ती आनंदात होती आणि चित्रकलाप्रेमी राहून देखील नाट्यकलेशी तिचा सूर जुळला. काही वेळा (उतावीळपणे) जाणीवपूर्वक काहीही न करता आपल्या मुलांना वेळ देणं गरजेचं असतं हे मला कामातल्या अनुभवाने शिकवलं.
प्रसंग सहावा :मी ज्यांच्याकडे वयाच्या पाचव्या वर्षांपासून नाटक शिकलो, त्या दादांनी (दत्ता पुराणिक) “किती मुलं हाताखालून गेली; ह्यापेक्षा किती मुलं हाताशी लागली” ह्या तत्वाला दिलेलं महत्व. हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कारण पालक असणं हे संख्यात्मक विशेषण नसून गुणात्मक विशेषण आहे हे लक्षात येणं जास्त महत्वाचं आहे.
एकदा एका कीर्तनामध्ये बोलताना श्री. चारुदत्त आफळे [आफळेबुवा] म्हणाले, “सध्या आपली सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य कमी होत चाललेलं आहे.” मला ते अगदी मनोमन पटलं. एखाद्या कलेच्या/विद्येच्या/शास्त्राच्या शिक्षणासाठी विद्यार्थी गेला असता, त्याचे पालक शिक्षण सुरु होण्यापूर्वी शिक्षकांना विचारतात की माझा मुलगा/मुलगी प्रसिद्ध कधी होईल? मला जर एखाद्या विद्येत, कलेत अथवा शास्त्रात पारंगत/सामर्थ्यवान व्हायचे असेल तर मला व्यवस्थित, आवश्यक तेवढी उपासना करावी लागेल आणि ती उपासना यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी माझ्यात पुरेसे सामर्थ्य निर्माण करायला हवे, याची जाणीव [उपदेश नव्हे] पालक म्हणून आपल्या पाल्याला आपण करून दिली पाहिजे.
आपण जे शिकतो आहोत, ते का शिकतो आहोत? याचं भान असलं तर शिक्षण कंटाळवाणं होणार नाही. त्यामुळे हे भान शालेय वयापासून विद्यार्थ्यांमध्ये जागवलं पाहिजे. हे भान जागवण्याचं काम जितकं शिक्षकाचं आहे तितकंच ते पालकांचं सुद्धा आहे. या भानामुळे विद्यार्थी म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून विचारांची उत्तम बैठक असलेल्या व्यक्ती समाजात असतील. उत्तम विचारांची बैठक असलेला माणूस, मनातील संवेदनशीलतेचा अर्क आणि तल्लख बुद्धीचा तर्क याची व्यवस्थित सांगड घालू शकतो.
मुळात पालक म्हणून मी कसा आहे? चांगला किंवा वाईट ह्या स्पर्धेत मी नाही. कारण “Best Parents” असं काही अस्तित्वात असतं हेच मुळी मला मान्य नाही. पण माझं पालक म्हणून घडणं सुरू रहाणार आहे हे निश्चित.
©अमृत सामक
Beautiful observations..!
पालक म्हणून घडणं सुरू रहाणार आहे!! सततची प्रक्रिया
Nice
Very nice