कलारसास्वाद _ नाट्यकला

देवानामिदमामनन्ति मुनय: कान्तं क्रतुं चाक्षुषम् ।
रुद्रेणेदमुमाकरव्यतिकरे स्वाङगे विभक्तं द्विधा ॥
त्रैगुण्योद्भवमत्रलोकचरितम् नानारसं दृश्यते ।
नाट्यंभिन्नरुचेर्जनस्य बहुधाsप्येकं समाराधनम् ॥

“स्व-विकास आणि कलारसास्वाद” ह्यासंदर्भाने झालेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे नाट्यकला रसास्वाद ह्याविषयी शालेय शिक्षकांशी संवाद साधता आला ह्याचा एक प्रकारे आनंद आहे.   
मुळात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करू शकते हे सत्य आहे. बऱ्याचदा अगदी चांगला अभिनय करून वेळ मारून नेऊ शकते हे ही नाकारता येणार नाही. आणि वर नमूद केलेल्या श्लोकातील शेवटच्या ओळीचा अर्थ हा “नाट्य हे बहुधा एकच असे मनोरंजन आहे, ज्याने भिन्न भिन्न आवडीच्या लोकांचे रंजन होते” असा आहे. त्यामुळे नाटक ह्या कलाप्रकाराशी सगळ्यांचंच जवळचं नातं आहे हे ही सत्य आहेच.
बहुसंख्य लोक हे पूर्वीपासून नाटकाशी प्रेक्षक ह्या नात्याने जोडले गेले आहेत. पूर्वीच्या काळात अभिनय कलेला नसलेला सन्मान अलीकडच्या काळामध्ये खूपच वाढलेला दिसतो. पूर्वी चेहऱ्याला रंग फासणे हे कमीपणाचे किंवा हलक्या दर्जाचे काम समजले जाई. अलीकडच्या काळात मात्र ह्या कलेकडे अधिक अदबीने, मानाने पाहिले जाते. त्याचे मोठे कारण म्हणजे ह्या क्षेत्राला दूरदर्शनमुळे (television) मिळालेले आकर्षक स्वरूप हे आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात नाटक ह्या कलाप्रकाराकडे stepping stone म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. मुळात नाटक आणि मालिका/चित्रपट ही दोन माध्यमे संपूर्णपणे वेगळी आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे.
नाटक ही एक जिवंत कला आहे. नाटकात जे घडते ते प्रेक्षकांच्या समोर घडते, आणि ज्यावेळी जसे घडते त्यावेळी ते तसेच दिसते. त्यामुळे एखाद्या नाटकाचे दोन वेगवेगळे प्रयोग हे वेगवेगळा अनुभव देतात.”कलारसास्वाद” ह्या पातळीवर नाटक हे अत्यंत dynamic अनुभव देणारे माध्यम आहे. कोणत्या व्यक्तीला कोणती गोष्ट भावेल हे निश्चित सांगता येणे कठीण आहे किंबहुना सर्वांना सर्व काही आवडेल हे म्हणणे देखील धाडसाचे ठरेल. नाटकाची संहिता, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, सादरीकरणाची पद्धत, अभिनय, संगीत/पार्श्वसंगीत, दिग्दर्शन इ. वेगवेगळ्या कौशल्यांचा मेळ नाट्यकलेत साधला जातो. ह्या प्रत्येक कौशल्याविषयी प्रत्येक प्रेक्षकाला जाण/आवड असेलच असे नाही. नाट्यकलेच्या बाबतीत सर्वसामान्य प्रेक्षकांवर होणारा एकत्रित परिणाम (total effect) महत्वाचा ठरतो. ह्या परिणामाचे विश्लेषण समीक्षक बारकाईनं करतात, काही प्रमाणात प्रेक्षक आपापल्या आवडीनुसार किंवा कौशल्यानुसार एकत्रित परिणामाबरोबरच वरीलपैकी एखाद-दुसऱ्या कौशल्याविषयी टिप्पणी करतात/जागरूकअसतात. मात्र बहुसंख्य प्रेक्षकांसाठी total effect महत्वाचा ठरतो.
ह्याव्यतिरिक्त “रसास्वाद” ह्या पातळीवर अनेकविध अडथळे आहेत, जे दूर झाले किंवा केले गेले तर कलारसास्वादाचा स्तर उंचावेल आणि पर्यायाने कलाकृतींचाही स्तर उंचावेल. ह्यामध्ये असलेल्या अडथळ्यांविषयी थोडक्यात…
कोणत्याही प्रकारे प्रेक्षकांचे पूर्वग्रहदूषित असणे. हे पूर्वग्रहदूषित असणे वेगवेगळ्या पातळीवर असते. उदाहरणार्थ

  • एखाद्या विशिष्ट कलाकाराविषयी मनामध्ये कोणत्याही कारणांमुळे अतीव आदर/प्रेम अथवा नावडीची भावना असणे.
  • एखादे समीक्षण वाचून, तेच डोक्यात ठेवून कलाकृती पहाणे.
  • एखाद्या नाटकाची संहिता वाचून, मनामध्ये त्याचे स्वतः तयार केलेले कल्पनाचित्र घेऊन कलाकृती पहाणे.
  • एखादी पुनरुज्जीवित केलेली कलाकृती, ही आधी सादर झालेल्या कलाकृतीच्या तुलनेत पहाणे.
  • नाटकाची संहिता, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, सादरीकरणाची पद्धत, अभिनय, संगीत/पार्श्वसंगीत, दिग्दर्शन ह्यापैकी कोणत्यातरी कौशल्याविषयी स्वतःची मते पक्की ठेवून कलाकृती पहाणे.
  • एखाद्या विशिष्ट शैलीच्या अतीव प्रेमात असणे.
  • कुणाच्यातरी आग्रहाखातर कलाकृती पहाणे     

ह्यातला दुसरा अडथळा म्हणजे काळानुरूप बदलेला जगण्याचा वेग. ह्यामुळे कलाकृतींची कमी होणारी सादरीकरणाची कालमर्यादा, प्रेक्षकांची एखादी दीर्घ कलाकृती पहाण्याची घटत चाललेली मानसिकता ह्यामुळे देखील कलाकृतींना fast food सारखी दिली जाणारी वागणूक. “हे नाटक ८.३० वाजता संपेल, तिथून लगेच निघून मी बरोबर अर्ध्या तासात पोहोचेन. म्हणजे आपण ९.१५ वाजता त्या सिनेमाचा शो पाहू शकू”. हे वाक्य रसास्वाद ह्या कल्पनेला छेद देणारं नव्हे तर नेस्तनाबूद करणारं आहे. कलाकृती पहाणे हे काही एखादे सामाजिक/सांस्कृतिक कर्तव्य पार पाडण्याचे काम नाही. ती माणसाची वैयक्तिक गरज आहे. 
तिसऱ्या प्रकारचा अडथळा हा जगण्याच्या बदलेल्या वेगाचं कारण आहे आणि ते म्हणजे आपल्या जगण्यावर जणू काही मालकी गाजविणारी अनेकविध gadgets आणि apps. आपलं जगणं सोप्प करण्यासाठी आपणच तयार केलेली अनेक माध्यमं आणि त्या माध्यमाचा पाया म्हणजे internet. ह्याचा आपण उपयोग करण्यापेक्षा ह्याच्या आहारी जाणं हे मनुष्यजातीसाठी घातक ठरतंय. अर्थातच त्याचा विपरीत परिणाम हा सर्वच कलाप्रकारांवर झालेला दिसतो. एखाद्या संगीत मैफलीला गेल्यानंतर “श्रवण” भक्तीचा आनंद लुटण्यापेक्षा ती मैफ़ल record करण्यात प्रेक्षक अधिक गुंग होताना दिसू लागले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा प्रेक्षक ना त्या क्षणाचा आनंद लुटू शकतो आणि record केलेलं नंतर ऐकू असा विचार केल्यामुळे इतकी सारी recordings साठतात की ते ही ऐकायला वेळ होत नाही. नाट्यगृहात नाटक सुरू असताना mobile वाजणे, mobile वर संभाषण करणे हे ही ह्याच गुलामी मानसिकतेचे प्रतीक आहे.
ह्या सगळ्या समस्यांवर उपाय काय? असा प्रश्न जर पडत असेल तर त्यावर “शालेय पातळीवरील प्रशिक्षित शिक्षकाने दिलेले कला प्रशिक्षण” हे उत्तर कामी येऊ शकेल. शालेय वयात लागलेल्या चांगल्या सवयी दीर्घकालीन असतात. विशेषतः कोणत्याही कलाप्रकारांविषयी शाळेत लागलेली ओढ, निर्माण झालेली आत्मीयता, वाढलेली गोडी ही कौशल्य विकासनाबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व विकासासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे कलाप्रशिक्षणाचं महत्व नाकारून चालणार नाही.
कलारसास्वाद ही वैयक्तिक पातळीवर अनुभवण्याची गोष्ट आहे. मी पाहिलेले नाटक मला काय अनुभव देऊन गेले, मला त्यात काय आवडले, काय नाही आवडले, जे आवडले ते कशामुळे आवडले किंवा जे नाही आवडले ते कशामुळे नाही आवडले, इतका सांगोपांग विचार दरवेळी नोंदवला जाईल असे नाही तरीही एखाद्या कलाकृतीमुळे मनःपटलावर काही तरंग उमटायला जो वेळ आवश्यक असतो तेवढा वेळ (कलाकृती पहाण्यापूर्वी, कलाकृती पहात असताना आणि कलाकृती पाहून झाल्यानंतर) स्वतःला देणे आवश्यक आहे.
प्रेक्षक म्हणून लहान मुलं असलेल्या, मी अभिनय करत असलेल्या एका नाटकाच्या निमित्ताने मला “प्रेक्षक आणि रंगकर्मी” ह्यांमधील नात्याविषयी दोन वर्षांपूर्वी विचारप्रवृत्त केले होते. तेव्हा आमच्या नाटकानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला भेटणारी मुलं, आम्हाला हा सीन नाही आवडला किंवा तो खूप आवडला असं अत्यंत स्पष्टपणे सकारण सांगणारी मुलं पाहिल्यानंतर वाटलं की प्रेक्षकाला या मुलांसारखं निरागसपणे आपापल्या भावविश्वाशी आणि अनुभवांशी प्रामाणिक राहून कलाकृतीकडे पहाता आलं पाहिजे. तसं शक्य झालं तर त्यांची प्रतिक्रिया ही ‘कुणीतरी काहीतरी म्हणेल’ किंवा ‘कुणालातरी काहीतरी वाटेल’ या असल्या प्रभावांखाली न असता किंवा तांत्रिक रसास्वादासाठी नसून, खरी असेल. आणि कदाचित अशा प्रतिक्रिया चांगल्या कलाकृती निर्माण होण्यासाठी मदत करतील.

याआधी  उल्लेख करताना ‘आपापल्या भावविश्वाशी आणि अनुभवांशी प्रामाणिक राहून कलाकृतीकडे पहाता आलं पाहिजे’ असा एक मुद्दा नमूद केला होता. त्याच मुद्द्याला धरून कलारसास्वाद आणि आपण (प्रेक्षक) ह्याविषयी थोडं सविस्तर पाहूयात. प्रेक्षक म्हणून नाटक पहात असताना त्याचा आनंद (आस्वाद) घेणं हा प्रमुख हेतू असतोच. ह्या आनंद/आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेमध्ये एकूण कलाकृती म्हणून आपण त्याकडे पहात असतोच, मात्र त्यातली इतर अंग ही आपापल्या परीनं त्याला कारणीभूत ठरत असतातच. उदा. एखाद्या नाटकात पात्रांची वेशभूषा अगर नेपथ्य आपल्याला आवडून जाते किंवा प्रभावित करते क्वचित स्तिमित करून जाते. एखाद्या नाटकात पात्रांचे संवाद, एखाद्या नाटकात नटांचा अभिनय किंवा एखाद्या नाटकातील प्रकाशयोजना असे काही मुद्दे असतात. आपल्याला आवडणाऱ्या ह्या गोष्टी किंवा न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा रसास्वाद प्रक्रियेचा भाग आहेत. काही उदाहरणे पाहू. ही उदाहरणे “ते” नाटक पाहिलं असेल तर चटकन कळतील, मात्र पाहिलं नसेल तरी उदाहरणातून मुद्दा पोहोचेल असा प्रयत्न आहे.त्यामुळे उदाहरण मात्र विस्तृत होण्याची शक्यता आहे.  
“ही वाट दूर जाते” ही दिनकर बेडेकर लिखित एकांकिका… ही गोष्ट आहे एका सुंदर मात्र जन्मतः अंध असलेल्या मुलीची आणि तिच्या प्रेमात पडलेल्या एका डोळस मुलाची. हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडतो ह्याला कारण केवळ टी सुंदर असते म्हणून नाही तर अंध असूनही तिचं सामान्य माणसासारखं जगणं त्याला भावतं. तिचा नकार तो महत्प्रयासाने होकारामध्ये बदलतो आणि त्यांचं लग्न होतं तिथे नाटक सुरू होतं. लग्नानंतरचे काही दिवस नव्या नवलाईचे असल्यामुळे आनंदात जातात, पण नंतर मात्र त्याला तिच्या ‘अंध असूनही डोळस माणसाइतकं परिपूर्ण वागण्याचा’ त्रास होऊ लागतो. म्हणजे  तो ज्या का कारणामुळे तिच्या प्रेमात पडलेला असतो त्याच कारणाचा त्याला त्रास होऊ लागतो. 
१. एका प्रसंगात तो काही जवळच्या मित्रांना हे बोलून दाखवतो, पण मित्र त्याचं बोलणं खोडून काढून तिचं काहीच चुकत नसल्याचं त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. ह्यामुळे तो अधिक निराश होतो आणि त्याचा तिच्या विषयीचा राग वाढू  लागतो. अशा परिस्थितीत  तो काही वेळा तिच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो (म्हणजे डोळे बंद करून न चुकता चालून पहाणे इ.) अर्थातच तो ह्यात अयशस्वी होतो आणि त्याची चिडचिड वाढते. त्यावेळी तो “स्पर्श” ह्या जाणिवेतून (अंध लोक ज्या पद्धतीने एखादी गोष्ट हाताळून पहातात त्याच पद्धतीनं) एक खुर्ची हाताळून पहात असतो. आता ह्या प्रसंगात केलेली प्रकाशयोजना (सोबत प्रकाशचित्र जोडले आहे) पहाताना काय काय जाणवते आहे ते पहा. 

DSC_1292.JPG

१. नेपथ्यामधील इतर घटकांपैकी ज्या महत्वाच्या घटकांकडे लक्ष वेधायचं आहे त्या सर्व गोष्टी प्रकाशात दिसत आहे. कारण ह्या गोष्टी “तिच्या” स्पर्श जाणिवेत महत्वाची भूमिका बजावतात. २. स्पर्शातून जाणिवा तपासून पहाण्याची कृती ठळकपणे दिसावी म्हणून पात्राच्या हातांपासून वरच्या भागात प्रकाशाची असलेली तीव्रता आणि खालच्या भागात असलेली प्रकाशाची तीव्रता ह्या भिन्न आहेत.हे झालं तांत्रिक… ३. वर नमूद केलेल्या कथेप्रमाणे त्या पात्राची त्या प्रसंगातील एकाकी, निराश मनोवस्था आणि केवळ स्वतःच्या बाजूने विचार करण्याची वृत्ती ह्या चौकटीत तीव्रतेने दिसून येते. असा दृश्य परिणाम साधण्यासाठी केलेली ही प्रकाशयोजना आहे. वर नमूद केलेलं हे सगळं किंवा ह्यापेक्षा आणखी काही वेगवेगळं जाणवणंही शक्य आहे. 
आता दुसरं उदाहरण पाहू. “अलबत्या गलबत्या” हे नाटक. (आत्ताचं नाही, ज्या वेळी दिलीप प्रभावळकर करत असत ते) त्यावेळी मी पाहिलेल्या नाटकाच्या प्रयोगाचा परिणाम आजही २५-३० वर्षांनंतरही माझ्या लक्षात आहे. ह्यामध्ये चेटकीणीची entry हा एक औत्सुक्याचा मुद्दा होता. त्यावेळी चेटकीण प्रेक्षकांमधून entry घेत असे. प्रेक्षकांच्या रांगांमध्ये असलेल्या gangway मधून बऱ्याचदा ही चेटकीण येई आणि ती आली की आरडाओरडा, किंकाळ्या नुसती धमाल…. काही वेळा repeat audience असेल तर त्या क्षणी चेटकिणीच्या entryसाठी बरोबर तिकडे डोळे लावून बसत असत, मग अशा वेळी चेटकीण येई प्रेक्षकांतूनच मात्र दिशा बदलून येई त्यामुळे प्रेक्षकांना अधिक गंम्मत वाटे आणि प्रेक्षक ते appreciate करत असत. त्याविषयी नंतर बोलत असत. हे बोलणं अर्थात नाटकाचं रसग्रहण…

1dp.jpg

आणखी एक उदाहरण पाहू. हे विविध कारणांनी अतिशय गाजलेलं नाटक. “घाशीराम कोतवाल” आता ह्यामध्ये माणसांची एक भिंत दाखवली आहे. (सोबत छायाचित्र जोडले आहे.) ही रूपकात्मक आहे. १४-१५ नटांच्या माध्यमातून, त्यांच्या नृत्यात्मक हालचालींमधून उभारली जाणारी ही भिंत वेगवेगळ्या रचनेमध्ये वेगवेगळ्या रूपकाचं काम करते. आणि अतिशय प्रभावीपणे नाटकाची गोष्ट पुढे नेत रहाते.  

_0c2fe8a6-e1b5-11e7-b4c0-9346261494eb.jpg

ही काही उदाहरणे दृश्य माध्यमाला धरून झाली; पण ह्याव्यतिरिक्त संवाद हे आणखी एक प्रभावी माध्यम, ज्यामधून प्रेक्षकाला मिळणारा अनुभव हा वेगवेगळा असतो. लक्षात येण्यासाठी पुन्हा काही प्रसिद्ध उदाहरणे पाहू. “नटसम्राट” या नाटकातला “कुणी घर देतं का घर?” हा संवाद उदाहरणादाखल पाहू. “नटसम्राट” हे नाटक विविध नटांनी गाजवलेलं आहे. दत्ता भट, सतीश दुभाषी, श्रीराम लागू, (सध्या) मोहन जोशी ही काही मला माहिती असलेली नावं. ह्यापैकी प्रत्येक नटाची अभिनय शैली आपापल्या पद्धतीने वेगळी, अद्वितीय (Unique) त्यामुळे हा संवाद म्हटल्यावरचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम हा वरवर पहाता एकसारखा वाटत असला तरीही अत्यंत सूक्ष्म पातळीवर तो भिन्न वेगवेगळा असतो. एवढंच कशाला एकाच नटाने केलेल्या एकाच नाटकाच्या वेगवेगळ्या प्रयोगामध्ये वेगवेगळा अनुभव येणं शक्य आहे; किंबहुना प्रत्येक प्रयोगाला एकसारखा अभिनय न करणारा, प्रत्येक प्रयोगात काही नवं शोधणारा नट हा भ्रमरवृत्तीने आनंद शोधत रहातो.  त्यामुळे प्रेक्षक म्हणून एकच नाटक आपण वारंवार पहात असू तर नटांशी बोलताना “मागच्या प्रयोगाप्रमाणे ह्या प्रयोगात तुम्ही ते अमुक तमुक वाक्य तसंच्या तसं म्हटलं नाहीत” असं न म्हणता तो नट काय काय वेगळं करतो आहे आणि त्याचा आपल्याला काय वेगळा अनुभव मिळतो आहे हे सजग प्रेक्षक म्हणून आपलं काम आहे.
त्यामुळे एखादं नाटक पाहिल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करणं हे केवळ आवश्यक नाही तर गरजेचं आहे. ह्या अशा चर्चांमधून, आपली मतं मांडता मांडता इतरांची मतं ऐकणं, त्यातून नवा दृष्टीकोन समजून घेणं, त्यावर समतोल विचार करणं इ. गोष्टी सातत्याने केल्याने केवळ चांगली कलाकृती पहाण्यासाठी नव्हे तर कलाकृती चांगल्या पद्धतीने पहाण्याची सवय लागण्यासाठी उपयुक्त आहे. ही सवय बालपणापासून असेल; म्हणजे शाळेतल्या मुलांचं पाहिलेलं नाटक असू देत  किंवा एखादं व्यावसायिक नाटक असू देत शिक्षकांनी ह्या विषयावर मुलांना बोलतं केलं पाहिजे आणि नुसतं बोलतं न करता मुलांच्या बोलण्याला प्रत्येक चर्चेगणिक चांगली दिशा मिळत राहील हे पहात एखाद्या चांगल्या Curator प्रमाणे काम  केलं पाहिजे. 
ह्या सगळ्याचा परिणाम अर्थात सूज्ञ प्रेक्षक घडण्याच्या प्रक्रियेकडे जाणारा असेल. म्हणजे मग त्यातून नाटक सुरू होण्यापूर्वी “नाटक सुरू होते आहे फोन बंद ठेवा” अशी सूचना केल्यानंतर संपूर्ण नाटकात ह्या किंवा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेक्षक किंवा कलाकार कोणालाच त्रास न होता दोघांनाही कलाकृतीचा मनसोक्त आनंद घेता येईल. 

© अमृत सामक

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *