‘सृजनाच्या वाटा’
(गेली दहा वर्षे निरंतर होत असते ‘सृजनाच्या वाटा’ ही बालनाट्य कार्यशाळा. शिरगाव, कणकवली, मालवण आणि देवगड या ठिकाणी ही कार्यशाळा आठवड्यातून एका संध्याकाळी अशी सुरू आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली इथल्या कार्यशाळेतले सुरुवातीचे वर्षभरातील काही अनुभव इथं शब्दात आणण्याचा हा प्रयत्न.)
१. माणूसपण
प्रज्ञा आणि करुणेचा अर्थ शोधत,
अभय आणि अहिंसा समजून घेत,
स्वातंत्र्य आणि समता अनुभवत,
करायचा आहे प्रवास…
करायचा आहे प्रवास
सगळ्यांनी एकत्र गाणी म्हणत,
कथा, कविता, निबंध वाचत,
चित्रं काढत, शिल्पं घडवत,
नाटकं, चित्रपट पाहत…
अर्थात यासाठी वेळ तर काढायला हवा!
तोही नियमितपणे.
विचारच नव्हे तर कृतीतही गांभीर्य हवं,
नम्रता, ऋजुता, सचोटी, धीर हवा.
हे सगळं कष्टानं, प्रचंड इच्छाशक्तीनं,
हळूहळू साध्य होईलच ! करूच!!
कारण
आपल्याला तर चांगलं माणूस व्हायचं आहे !
२. बंदिस्त शिक्षण व्यवस्था आणि मुलांची कोंडी
आजच्या बंदिस्त, पुस्तकी, आणि पाठांतर प्रेमी शिक्षणामुळे मुलांच्या मुक्त विचारांना थोडीसुध्दा जागा मिळत नाही. त्यांच्या कल्पना, भावना, त्यांचे विचार हे अव्यक्तच राहतात. मुलांना मोकळा, त्यांचा स्वतःचा हक्काचा, त्यांना हवाहवासा वाटणारा, आनंदाचा वेळ आपण नाकारतो आहोत. त्यांच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी जो विरंगुळा असायला हवा आहे, तो त्यांना कसा मिळेल, याचा विचार करणं जणू आपण सोडून दिलेलं आहे. अशा वेळी मला रवींद्रनाथ आठवतात. सतत आठवत राहतात. त्यांचं ‘शांती निकेतन’ आठवत राहतं.
३. शांती निकेतन
सगळ्यांना एका साच्यात घालून कारकून तयार करणाऱ्या यंत्रणेला रवींद्रनाथ टागोरांनी दिलेलं उत्तर होतं ‘शांती निकेतन’. त्यांच्या काळातही त्यांना त्या वेळची शिक्षण व्यवस्था मुलांच्या नैसर्गिक विकासावर बंधने आणणारी वाटत होती.आज दिडशे वर्षांनी सुद्धा ती आपण बदलू शकलो नाही. उलट ती आणखीच क्रूर झाली आहे. मुलांना जखडू पाहत आहे, त्याच पारंपारिक चौकटीत. आणि म्हणूनच ‘शांती निकेतन’ चा अनुभव पुन्हा पुन्हा सर्वांनाच घेता यावा असं अतिशय तीव्रतेनं सारखं वाटत राहतं.
४. निसर्ग सहवास
सगळ्यांनी एकत्र यावं. निसर्गाकडे मन भरून पहावं.
गाणी गावी, गाणी रचावी. संगीत छेडावं, नृत्य करावं.
काही लिहावं, काही वाचावं. स्वतःत दडलेल्या गुणांना जाणावं.
त्यांना फुलू द्यावं. फुलवावं.
आनंदाचे कण शोधावे. सौंदर्याची आस धरावी.
स्वतःची सिद्धता करावी. मैत्रीचा अनुभव घ्यावा.
जगाच्या कल्याणाचा विचारा करावा. नीतीचा विचार करावा. वादविवाद करावे.
भविष्याची स्वप्नं रंगवावी. काळाला हवा तसा आकार द्यावा.
प्रवाहाबरोबर वाहत न जाता प्रसंगी प्रवाहाशी झुंजण्याचा पराक्रम करावा.
वैश्विक सत्याचा मागोवा घ्यावा.
५. मुलांशी संवाद
मुलांशी संवाद व्हायला हवा.
त्यांच्या मनात शिरून त्यांच्या जाणीवा विकसित करायला हव्यात.
त्यातूनच त्यांना दिशा मिळू शकते.
६. नाटक एक जीवनानुभव
‘नाटक’ ही हे सगळं करू शकणारी प्रयोगशाळा आहे. नाटक ही जीवनानुभव देणारी विस्मयकारक गोष्ट आहे. सगळ्यांना एकत्र जोडणारं सुंदर माध्यम आहे ते! गेली ३०-३५ वर्षे मी शिरगावातल्या मुलांसोबत नाटकाच्या निमित्तानं या आणि अशाच गोष्टी करतो आहे. खूप सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव आहेत या प्रवासातले. म्हणूनच आचरेकर प्रतिष्ठानच्या श्री. वामन पंडितांनी विचारलं तेव्हा, त्यांच्याशी बोलताना,
‘असचं काम कणकवलीच्या मुलांसोबत करायला मला आवडेल.’ असं मी खूपच आनंदात सांगितलेलं.
कणकवलीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे पाच ते पंधरा वयोगटातल्या मुलांसाठी २०१२ च्या एप्रिलमध्ये शिबीर घेतलेलं. ते फक्त नाटकाविषयीचं नव्हतं. ते शिबीर हे ‘शांती निकेतन’च्या शोधात टाकलेलं पाऊल होतं. त्याचं नाव म्हणूनच ‘बालनाट्यशिबीर’ असं न ठेवता ‘सृजनाच्या वाटा’ असं होतं.
७. मनात रवींद्रनाथ
नाटकाच्या निमित्तानं एकत्र येत
मैत्रीच्या हातांची गुंफण करीत
आपण धुंडाळणार आहोत,
‘सृजनाच्या वाटा’.
काही अर्थपूर्ण निर्मिती करताना
शब्द, सूर, प्रतिमांची सांगड घालत,
दूर दूर जाणार आहोत.
नवी सृष्टी, नवी दृष्टी
निर्माण करत
इंद्रधनुष्याशी खेळणार आहोत.
झाडं, पक्षी, डोंगर, पाणी, यांची गाणी गाणार आहोत.
‘शांती निकेतन’ हा एक अनुभव असतो.
ती नसते जागा किंवा शाळा
ती असते वेळा
मनानं ‘रवींद्रनाथ होण्याची.
कथा, कविता, चित्र, नृत्य, शेती, शिल्प, संगीत…
आणि ‘नाटक’ करण्याची.
८. सुरुवात
असं काहीसं उद्दीष्ट मनाशी ठरवून आम्ही सुरुवात केली. कवी-कल्पना म्हणून व्यावहारिक जगात चेष्टेचा विषय होण्याची शक्यता असतेच नेहमी. पण तशी संधी नाही मिळाली कुणाला. सुरुवातीच्या दिवशी प्रा. अनिल फराकटे सरांनी मुलांशी आणि पालकांशी ‘सृजनाच्या’ सौंदर्याविषयी संवाद साधला. अनेकांनी शुभेच्छा दिल्या. अनेक मुलांनी ‘सृजन’ हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता त्या दिवशी.
९. आनंदाची संध्याकाळ
कौतुक वाटतं ते प्रतिष्ठानच्या सगळ्याचं लोकांचं. किती शिस्तबद्ध आहेत सगळे! आवाज न करता काम करून, ते लांब उभं राहून लक्ष ठेवत असतात. मुलांच्या हाकेला क्षणात धावून येतात. चाळीसेक मुलं, त्यांचे पालक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असे आम्ही रोज जमू लागलो. संध्याकाळी ६ वाजता सगळे हजर. ते अगदी दहा वाजेपर्यंत.
मित्र झालो. अगदी गट्टीच झाली सगळ्यांची. एक कुटुंब झालं आमचं. रोजची संध्याकाळ आनंदाचीच व्हायला लागली. ओळखी व्हायला लागल्या. खेळ रंगू लागले. एकमेकांना हाका मारणं सुरू झालं. मना-मनांमध्ये रस्ते बांधले जावू लागले. कुणी गप्प गप्प होतं. कुणी खूप बोलकं होतं. कुणी शांत होतं, कुणी खोडकर होतं. सगळ्यांचे स्वभाव हळुहळू कळू लागले. सगळे हळुहळू रुळू लागले.
१०. म्युझिक, मस्ती, गप्पा आणि गाणी
शिबीरात रोज सुरुवातीचा एक ते दिड तास गप्पा, गोष्टी, गाणी, वाचन, खेळ यासाठी आणि अल्पोपहारानंतर नाटक, असं ठरलेलं होतं. आणि आम्ही ते तसं करत होतो.
११. कवी कट्टा
संध्याकाळी दिवस मावळून अंधार होईतो आम्ही नदिकिनारी असलेल्या ‘कवी-कट्ट्या’वरच बसत असू.
तिथनं गड नदीचं पात्र दिसतं. रेल्वेचा आणि इतर गाड्यांचा असे दोन पूल दिसतात. नदीच्या परिसरात पक्षी दिसत राहतात. तारावर बसलेले. उंचावरून उडणारे. आणि शिवाय त्यांचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं ती वेगळीच मौज. पुलावरच्या गाड्या पाण्यात उलट्या धावताना बघून हसत असू.
तिथंच काळा पांढरा रंग असलेला खंड्या कित्यकांनी पहिल्यांदाच बघितला. त्याची शिकार करण्याची पद्धत तर बघायलाच हवी. तो दगड हवेतून खाली यावा तसा अगदी ओळंब्यात पाण्यात झेप घेतो. आणि पाण्याच्या तळातला मासा घेवून तितक्याच वेगानं वर येतो. वेडा राघू, कोतवाल, बगळे, कावळे सगळ्यांचं निरिक्षण करायला ती छानच आहे जागा. झाडांच्या जवळ, त्यांना स्पर्श करत, तिथल्या पाचोळ्याशी खेळत, फुलं, बिया शोधत शोधत, तिथं बसायला खूपच आवडतं सगळ्यांना. तिथल्या पायऱ्यांवर बसून, पाण्यावर उठणारे तरंग बघत, आम्ही किती तरी विषयांवर बोललो असू.
देव आहे की नाही यावर तर केवढी प्रचंड चर्चा झालेली. ‘देव म्हणजे एक चांगुलपणाची कल्पना आहे,
पुराणातल्या गोष्टी या चांगल्या वाईटाच्या अभ्यासाचा विषय आहे; आणि त्या खन्या की खोट्या हा प्रत्येकाने ताडून बघण्याचा भाग आहे वगैरे वगैरे… इथपर्यंत आम्ही आलो होतो. हा विषय सततच्या क्रमशः चर्चेचा भागच झालेला आहे.
जग कसं निर्माण झालं, ग्रहणं कशी होतात, जादू खऱ्या असतात का, असे किती तरी विषय यात असत.
एकमत होणं महत्त्वाचं नसून विचार करायला आणि चर्चा करायला शिकणं महत्त्वाचं आहे; हे आता कळतंय.
१२. प्रश्नांचा पाऊस
दुसऱ्याला सांगावं असं काहीतरी असंतच प्रत्येकाकडे. पण ऐकणारा नसेल तर ते तसंच राहून जातं मनात.
मुलांचे प्रश्न न विचारता तसेच मनात राहून जातात. मुलांना काय वाटतंय ते सांगून टाकायला ही छान जागा होती. अनुत्तरीत प्रश्नांचा खूपच त्रास होतो. इथं त्याची काळजी घेतली जात होती. सगळ्यांची मनं जणू मोकळी होत होती. जगातला कोणताही प्रश्न इथं उपस्थित झाला नाही, असं झालं नाही.
काय वाट्टेल ते विचारा असंच या गप्पांचं स्वरूप होतं. काहीही मनात न ठेवता प्रश्न विचारून मोकळं व्हावं, उत्तर जाणून घ्यावं असंच ठरलेलं होतं.
म्हणून सगळ्या गोष्टी बाजुला सारून हा शंका निरसनाचा अर्धा-एक तास हा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. पूर्वी आजी-आजोबांबरोबर होणाऱ्या गप्पा आताशा होत नाहीत. आई बाबांना वेळ असतोच असं नाही. त्याततही टीव्ही सगळ्यांचाच वेळ खात सुटलाय, हे आणि वेगळंच. मुलांचं ऐकायला, मुलांशी बोलायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे; ही गोष्ट मुलांना खूप आवडलेली. मुख्य म्हणजे मी बोलण्यापेक्षा मुलांनी बोलावं, अशीच योजना असायची. खूप वेळा दंगा होतो. प्रत्येकाला बोलायचं असतं. मुलं त्यातून मार्ग काढतात. मग त्यांना एकमेकांचं ऐकायची सवय आपोआपच लागते.
शिस्तीच्या नावाखाली दडपणात राहणाऱ्यांपेक्षा ही अशी बडबड करणारी मुलं जास्त आवडू लागली आहेत.
दूरचा विचार करता, ही बोलकी, व्यक्त होणारी मुलं आतापासून स्वयंशिस्त शिकतीलच आणि त्याबरोबर स्वतःचं मत मांडायला कचरणार नाहीत. वर्गातल्या गमती, ऐकलेले जोक्स, बातम्यांवरच्या टिपण्या, क्रिकेटचे स्कोर, कोडी, सहलीची मजा, परीक्षेतले प्रश्न, वाचलेली पुस्तकं, नवे खेळ, राजकारण, नट नट्यांचे किस्से, एकमेकांच्या गोड तक्रारी, लहानपणीच्या आठवणी…. असं किती काय, काय!
१३. खेळ… तना–मनाचे!
रोज नवे नवे खेळ आम्ही शोधत होतो. मुलांनी त्यांना माहित असलेले खेळ एकदा घरनं लिहून आणलेले.
खेळांमुळे हालचाल वेगवान होतेच. आपण अंदाज घ्यायला शिकतो. नियम पाळायला शिकतो. निर्णय घ्यायला शिकतो. रक्ते वेगानं धावतं. आणि मग विचारसुद्धा!
रोज नवी, नवी पुस्तकं आम्ही चाळत होतो. त्यातलं निवडक काही वाचत होतो. सर्व मुलांनी आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांच्या याद्या तयार केल्या गेल्या गंमत म्हणून. तसंच प्रत्येकाच्या घरी असलेल्या पुस्तकांच्याही याद्याही आम्ही तयार केल्या. यात पालकांनी मदत केली. या निमित्तानं बऱ्याच पुस्तकांची नावं सगळ्यांना कळली. शिवाय ज्यांनी ती वाचली होती त्यांनी त्या पुस्तकांची ओळख करून दिली. प्रतिष्ठाननं मुलांसाठी बरीच पुस्तकं मागवली, ती त्यांना घरी नेवू दिली. मुलांनी त्या पुस्तकांवर बोलून त्यावर चर्चा केली.
मुलांचं वाचन फार कमी झालंय हे प्रकर्षानं जाणवलं. आम्ही बहिणाबाईंच्या कविता वाचायला घेतल्या आणि त्यातल्या उपमा, शब्द, त्या भाषेची गंमत यांनी मुलांना वेडच लावलं. बहिणाबाईंचं काहीच शिक्षण झालेलं नव्हतं हे ऐकल्यावर तर मुलं हैराण झाली. त्यांची शिक्षणाची व्याख्या बदलायला या कवितांचा खूप उपयोग झाला. शेतकरी, कमी शिकलेला म्हणजे अडाणी हे बरोबर नाही हे अगदी कळलंच त्यामुळे. रोज चार पाच करत कविता म्हणत आम्ही पूर्ण बहिणाबाईंचं वाचन, गायन केलं. मजा आली. प्रकाश नारायण संतांच्या कथा ऐकताना सगळेच मॅडसारखे हसत सुटलेले. लंपनशी दोस्ती म्हणजे जगण्याशी दोस्ती, कलेशी दोस्ती!
‘वाचू आनंदे’च कुठलंही पान उघडलं तरी चित्र, कथा, कविता यांची मेजवानी. आम्ही इंग्रजी कथा कविताही वाचल्या. रवींद्रनाथ, रस्कीन बॉड, वगैरे. इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं निम्म्यापेक्षा जात होती बीरात.
‘सृजनाच्या वाट’चं आणखी एक नाव सुरू झालेलं… ‘s.v. club!’ गमतीची नावे शोधणं हा मुलांचा आवडीचा खेळ असतो.
कधी आम्ही ‘एक प्रसंग’, ‘लहानपणीची आठवण’, ‘काल काय झालं..’, असे विषय घेवून सगळेच त्यावर बोलत असू. कधी अर्धी गोष्ट सांगून ती प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे पूर्ण करायला सांगत असू.
म्हणजे असं,
१. स्नेहाला उठायला उशीर झाला. कशीबशी ती शाळेत पोहोचली..
पुढची मुलांनी सांगायची. प्रत्येकाची स्नेहा वेगळी असायची.
२. राजा आणि राणी घोड्यावरून जंगलात निघालेले. इतक्यात एक मोठा आवाज आला….
प्रत्येकाच्या आवाजाचं कारण वेगळं असायचं.
३. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी राजू पळतच घरी आला….
मग प्रत्येकाचा राजू काही वेगळ्या गोष्टी करायचा.
कधी प्रत्येकाने एकेक वाक्य मिळवत मिळवत आम्ही एक गोष्ट तयार करायचो. त्या गोष्टीवर
कुणा एकाचा हक्क नसे मग.
कधी कुणी पाहुणे येवून त्यांच्या कामाबद्दल सांगत असत. कधी आम्ही सगळ्यांनी मिळून एखादा सुंदर सिनेमा पाहिला. त्यावर चर्चा केली. सगळ्यांनी मिळून प्रदर्शन बघण्याची संधी दोन वेळा आली. ‘दुष्काळी भागातील छायाचित्रांचं प्रदर्शन’ होतं. त्यावर तर आम्ही नंतर नाटक केलं. आणि त्या नाटकात त्या प्रदर्शनातील व्यक्तीरेखा आम्ही साकारल्या. एकदा आम्ही वनौषधींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं.
१४. चित्र
आम्ही एकत्र बसून चित्रं काढली. एकमेकांची सुद्धा चित्रं काढली. वेणी, बटा, जटा, भुवया, डोळे, नाक, कान, मान… सगळ्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले. कुणाचं बरोबर आलं. कुणी व्यंगचित्रात प्रवेश केलेला. मजा आलेली.
रोज मुलं घरच्या त्यांच्या जुन्या चित्रांच्या वह्या आणून दाखवून लागली. रोज नवी चित्र आणून दाखवू लागली. कवी-कट्टा ही चित्र काढण्याची आवडीची जागा झालेली.
१५. शिल्प
आम्ही माती काम केलं. एक मोठं प्रदर्शन भरवता येईल इतक्या वस्तू तयार झाल्या. फळं, प्राणी, खेळणी, गणपती, बाहुली, डायनासोर…असं बरंच काही. हातांना काम मिळालं की धमाल येते. प्रत्येकाचं वेगळंच चालतं डोकं. हे वैविध्य वेड लावून जातं. प्रत्येकाची आवड कळते अशा कामात.
१६. सहभोजन, वाढदिवस, विश्रांती वगैरे..
मधल्या सुट्टीत खाऊ, सरबत असे. आणि कुणाचा तरी वाढदिवस असला तर मग आणखीच काही खाऊ मिळे. आणि आनंदाचं वातावरण इकडे तिकडे भरून राही.
१७. गट, चर्चा आणि नाटक
मग मी मुलांना त्यांचे चार किंवा पाच गट पाडून नाटक करण्यासाठी विषय देत असे. त्यावर मुलं दहा पंधरा मिनिटाच्या विचारांती नाट्यप्रवेश सादर करीत. त्यावर नंतर चर्चा घडे. आणखी काय करता आलं असतं, घेतलेल्या प्रसंगाच्या अर्थापर्यंत कोण कोण पोहोचू शकलं, कुणाचं काय चुकलं, असं काय काय….
कधी मुलांनी एकमेकांच्या सादरीकरणारवर बोलायचं असे. नाटकाचं व्याकरण मुलांना नीटच कळायचं हळुहळू. कोणी चुकीची हालचाल केली, कुणाचं बोलणंच कळत नव्हतं, कोण भिंतीतून कसा गेला, अशा चुका काढायला आवडायचं त्यांना.
नंतर नंतर मुलं दुसऱ्यांचं कौतुक करायलाही शिकली. कोणी कसं भारी काम केलं वगैरे. किंवा ‘अमक्याने छान पाँज कसा घेतला’, किंवा असा कसा रडू शकतो तो, किंवा तुमच्या गटाचं छानच झालं, असं सुद्धा.
मुलांना नेपथ्य, प्रकाश, रंगभूषा, वेशभूषा, विंग्ज, अशी परिभाषा परिचयाची होत गेली. ती नाटकवाली होत चालली!
१८. नाटक–बिटक
नाटकाचे विषय देताना आम्ही सोप्यातून अवघडात जात राहिलो. सुरुवातीला माहितीतल्या गोष्टीचं सादरीकरण. म्हणजे टोपीवाला आणि माकडे, तहानलेला कावळा, लांडगा आला रे आला वगैरे. मग शाळा, सहल, बाजार,देऊळ, मैदान, शेत, विहीर, ग्रामपंचायत, समुद्र किनारा असे नित्याचे विषय. ज्यात निरिक्षणावर जास्त भर असे. त्यातही मुलं गोष्ट रचीत. मग कल्पनेला वाव देणारे विषय, जसं की, अंतराळ प्रवास, समुद्राच्या तळाशी, पहिला विमान प्रवास, ट्रेन निघाली मुंबईला, अपघात, हॉस्पिटल, संशोधन, उत्खनन, निवडणूक असे. कधी एखादं वाक्य, एखादा शब्द.. जसं की, मला मदत करायला आवडते, करुणा, आनंद, संकट, रात्र, भीती, माझे बाबा ग्रेट, आई-बाबाचं बालपण वगैरे.
नाटक करताना मुलं एकत्र बसून विचार करतात. गोष्ट तयार करतात. संवाद ठरवतात. नेपथ्य, प्रवेश, भूमिका हे सगळं योजतात आणि अतिशय देखणं नाटक सादर करतात. त्यात प्रत्येकाचा वाटा असतो. आणि ते चांगलं करण्याची सामुहिक जबाबदारी ती आनंदाने स्वीकारतात. यात कुणी काय काय भूमिका करून बघतं. थोडा वेळ त्या भूमिकेच्या सोबत जगताना त्या त्या प्रकारच्या प्रसंगाना तोंड देतं. हे सगळं मुलांना फार आवडतं. हा नवा खेळ त्यांना खूपच आवडू लागतो. मुलं घरी जायला तयार होत नाहीत.
त्यांना नाटकाची गंमत वेगवेगळ्या प्रकारे अनुभवायची असते.
१९. पालकांचा सहभाग महत्त्वाचा!
पालकांनीही मुलांसोबत रहावं, आस्वाद घ्यावा, सहभाग घ्यावा असा माझा आग्रह होता. मुलं मोकळेपणानं बोलतानाचा अनुभव सगळ्यानीच घ्यावा असं मला मनापासून वाटतं. काही पालक पूर्णवेळ बसून आनंद घेत. काही पालकांनी तर काही नाटुकली घरून लिहून आणलेली. आम्ही ती बसवून त्यांचे प्रयोग केले.
मुलांसाठी खाऊ आणून काही पालक त्यांचा उत्साह वाढवत होते. बघता बघता शिबीराचे दिवस संपायला आले. सगळ्यांनाच कसं तरी वाटत होतं. एक हुरहूर वाटत होती. आता हे भेटणं नाही होणार असं वाटत होतं. शेवटच्या दिवशी या हुरहुरीवर उपाय गवसला. सर्वानुमते दर शनिवारी शिबीर असंच चालू ठेवायचं असं ठरलं. आता या शिबीराला एक वर्ष पूर्ण झालंय. या एक वर्षात प्रत्येक शनिवारीच नव्हे तर आणखी कितीतरी वेळा आम्ही पुन्हा पुन्हा भेटलो.
आम्हाला बोलायला विषयांचं बंधन नव्हतं. मुलांच्या कडूनच विषय येत राहिले, गप्पा होत राहिल्या. दोन एकांकिका आम्ही बसवत आणल्या. आणि रोजचे प्रयोग होत होते तेही सुरूच राहिले.
मागे वळून बघावंसं वाटतंय. सगळंच दिसतंय असं नाही. दिसतंय ते सुद्धा सगळं सांगण्याइतका अवधी नाही. पण तरी काही गोष्टी सांगितल्याशिवाय नाहीच राहवणार. पण ते पुन्हा कधी तरी सावकाशीनं…
अनेक वाटा खुणावतायत. शब्द, सूर, रंग यांनी मनं भरली आहेत. भारली आहेत. सुंदर सहल सुरु आहे. नव्या वाटांवर चालण्यासारखा आनंद नाही !
चालण्यातला आनंद शब्दात नाही आणता येत.
२०. ‘सृजनाच्या वाटा… पुढचं वळण‘
वळणावळणाचा रस्ता दर काही क्षणाला नवी सृष्टी, नवी क्षितीजं उभी करतो. पुढे काय असेल, ही त्सुकता मनात निर्माण करतो. या रस्त्यावर चालण्याची गंमत म्हणूनच पुन्हा-पुन्हा आठवतही राहते. प्रवासात सोबती जितके जास्त तितका आनंद वाढत जातो. (तिसेक मुलं, त्यांच्या घरातली मंडळी, आम्ही तिष्ठानचे कार्यकर्ते) सृजनाच्या या वळणावळणांच्या वाटांवर गेली दोन वर्ष एकत्र चालतो आहोत. खूप आनंदाचा वास आहे हा. इथं थकव्याला नाही थारा. प्रसन्नतेचा वारा मात्र मन भरून राहिला आहे. मागच्या वळणावरच्या आठवणी पुढच्या पावलांना आपोआपच बळ देतायत. आम्ही आता घट्ट ओळखीचे झालो आहोत. एक कुटुंबच जणू. या वर्षी काही कारणांनी काही मुलांना येता नाही आलं. पण त्यांची जागा नव्या मुलांनी घेतली. खूप कमी वेळात ती मिसळली इथं. नव्या येणाऱ्या मुलांकडे त्यांच्या त्यांच्या गोष्टी होत्या…
गाणी, कविता, कोडी, विनोद… त्या आता आमच्या झाल्या.
प्रत्येक मूल आमच्या एकूण सृजनानंदात त्याची स्वतःची मोठी भर घालीत असतं. इथं सगळ्यांच्या एकत्र येण्याला म्हणूनच फार महत्त्व आहे. हा आनंद कुणा संस्थेचा, कुणा प्रशिक्षकांचा नाही तर तो सगळ्यांचा मिळून आहे !
२१. ‘नाटकांचे प्रयोग…. जबाबदारीची जाणीव‘
आम्ही ‘राक्षस तुमच्या घरात’ आणि ‘फास्ट फॉरवर्ड’ या दोन एकांकिका खूप कष्टानं, काळजीपूर्वक
आणि तरीही अगदी सहज, आनंदात सिद्ध केल्या. पडद्यामागे किती लोकांनी काय काय काम केली हे तर सांगणं अवघडच आहे. त्यात तरुण कार्यकर्ते होते. पालक होते.
मुलांनी भूमिका समजून घेतल्या आणि समरसून केल्या सुद्धा! चेहरे रंगवण्याची मुलांची आस होती ती पूर्ण झाली. खूप दिवस सुरु असलेल्या तालमींना अर्थ आला. प्रत्येक नाटकात १५-२० भूमिका असल्यामुळे
सगळ्याच मुलांना भूमिका मिळाली.
आचरेकर प्रतिष्ठानचं नाट्यगृह तुडुंब भरलेलं होतं. मालवण, सावंतवाडीपासूनचे रसिक होते. रसिकांच्या उपस्थितीनं रंगमंच नेहमीच प्रभावित होत असतो. मुलांना तो थरार अनुभवता आला. ते दडपण अनुभवता आलं. नाटक सादर करणं ही गंमत आहेच तशी ती एक वेगळी परीक्षाही आहे. संगीत, प्रकाशयोजना यांनी परीपूर्ण असे हे प्रयोग मुलांनी सहज वाटतील असे पण खूप एकाग्रतेने आणि परिश्रमपूर्वक सादर केले. प्रयोगानंतर चर्चा झाली. मुलांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. तालमीतले अनुभव सांगितले. नंतर मुलांशी बोलताना खूप गोष्टी नव्यानं समजल्या. कोण कुठे कसं विसरलं होतं, मग काय केलं वगैरे…
पण मुलांना आता कळलेलं होतं, नाटकाचा प्रयोग ही सर्वांनी मिळून करायची एक अत्यंत गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे.
ती नुसतीच गंमत नाही!
२२. ‘राजापूरचा दौरा‘
राजापूरच्या नवीनच बांधलेल्या रंगमंचावर पहिलं नाटक करण्याचा मान आम्हाला मिळाला तो श्री. वसंत आठल्ये यांच्या निमंत्रणामुळे. त्यासाठी अर्थात आम्ही दिवाळीच्या सुट्टीत वेगळ्या तालमी घेतल्या. सज्ज झालो आणि चक्क नाटकाचा दौरा’ अनुभवला. नेपथ्याचीच एक गाडी होती. आणि आमच्या पुन्हा कितीतरी गाडया. एक प्रवास, प्रयोग, नवं शहर, नवी माणसं, एकत्र जेवण… असा सगळा अनुभव.
संयोजकांनी आईस्क्रीम’ देऊन खूष केलं होतं मुलांना.
या दौर्याच्या आठवणींची एक स्वतंत्र ‘फाइल’ आता प्रत्येकाच्या मनात कायम ‘सेव्ह’ झाली असणार हे मात्र नक्की! बॅ. नाथ पै स्पर्धेच्या बक्षीस समारंभादिवशी आम्ही ‘फास्ट फॉरवर्ड’चा प्रयोग केला. सगळ्यांना तो खूपच आवडला. आता तर काय आम्ही सर्व सिंधुदुर्गचा दौरा करण्याच्या प्रयत्नात आहोत.
२३. ‘गप्पा‘
गप्पा मारणं ही गोष्ट अतिशय आवडतेच सगळ्यांना. एकमेकांच्या मनात डोकावण्यासाठी, आपल्याला वाटतं ते दुसऱ्याला सांगण्यासाठी गप्पांना पर्यायच नाही. या गप्पांना दिशा देण्याचं काम मला खूप आवडतं. अगदी साधासा प्रश्न विचारून मी मुलांचं बोलणं ऐकत बसतो. त्यांना किती, काय काय ठाऊक असतं!
त्यांची मतं जाणून घ्यायला तर गप्पा म्हणजे एखादं ‘भिंग’च! गप्पांच्या ओघात मुलं सावध नसतात.
वर्गात विचारल्याप्रमाणे प्रश्न विचारला तर सावध आणि सर्वमान्य ठरतील अशी उत्तरं शोधून ती सादर केली जातात. गप्पांचं तसं नाही. गप्पांमध्ये तुम्ही सहजपणे मुलांचं मन जाणू शकता. आणि जाणून घेतल्याशिवाय त्याला ‘वळण’ तरी कसं लावणार? एखाद्या विषयाचा खूप खल केल्याशिवाय त्याच्या चांगल्या वाईटाचा अंदाजच येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट ही चर्चेला घेऊन मुलांशी आपण बोलत राहिलो तर त्यांच्याशी काही तरी खऱ्या अर्थानं बोलणं होईल.
‘कितवीला आहेस?’ ‘परीक्षा कधी?’ ‘कोण होणार तू?’ अशा प्रकारचे ८-१० प्रश्न सोडून आपण खरंच मुलांशी आणखी काही बोलतो का, याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा. मुलांशी खूप खूप गप्पा करणं हे महत्त्वाचं सूत्र आहे. मुलं तुमच्याशी जेव्हा मनसोक्त गप्पा करू लागतील, तेव्हाच एक अदृश्य भिंत कोसळणार आहे. एरव्ही मुलं वेगळ्याच गाडीत बसलेली असतात. मुलं मोठ्या माणसांमध्ये मिसळत नाहीत असं नेहमी म्हटलं जातं. पण खरं तर मोठी माणसंच मुलांमध्ये शिरत नाहीत. त्यांच्या गप्पांमध्ये रस घेत नाहीत.
‘सृजनाच्या वाटा’ मध्ये अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा आम्ही ज्या गप्पा मारतो त्या जास्त महत्त्वाच्या वाटतात मला, या न थांबवणार्या गप्पांमधून मनांचं घुसळणं सुरु असतं. त्यातूनच उगवणाऱ्या सूर्याचा अंदाज येतो. सगळं हळुहळू स्पष्ट दिसू लागतं.
२४. ‘संस्कार‘
कीर्तनं, प्रवचनं अशा गोष्टींमधून पूर्वी लोकांशी संवाद साधला जात होता. त्यांची जागा पुढे व्याख्यानांनी घेतली. पण गावागावातून यापैकी काहीच अनुभवाला येत नाही. शाळेची बैठक भरते पण तिलाही मूल्यशिक्षणाचं ओझं झेपत नाही हे स्पष्ट झालंय. माहितीच्या पलिकडं ज्ञानच जिथं पुढं जात नाही तिथं पुढच्या अपेक्षा पूर्ण होतीलच कशा?
मुलांना नुसतं तोंडी सांगून काही होणार नाही. त्यांना विचार करायला भाग पाडायला हवं. त्यांना ते अनुभव द्यायला हवेत. एखादा शिक्षक स्वतःच्या उदाहरणाने मुलांवर संस्कार घडवतो. तसेच काही पालक किंवा गावकरीसुद्धा किंवा कुणीही हे काम मनावर घेऊ शकतो. पण ‘मुलांच्या समोर आपण वावरत आहोत. आपल्या बोलण्यावागण्याचा मुलांवर काय परिणाम होईल ?’ असा विचार किती लोक करतात हा खरंच प्रश्नच आहे. नाहीतर लोकांनी फटाके वाजवताना, दारु पिताना, शिव्या देताना हा विचार केलाच असता. नाही का?
बाकीच्यांचं सोडा पण ध्वनी प्रदुषणाविषयी मुलांना शिकवणारी शाळाच जर ढोल-ताशे आणि फटाक्यांनी मिरवणुका काढत असेल तर मुलांनी कुणाकडून आणि काय शिकायचं? मुलांच्या डोक्याची सतत परीक्षा घेतली जातेय. त्यांना संस्कारित होण्यासाठी मात्र सवड दिली जात नाही. ‘ज्ञानी’ होण्यासाठी त्यांना सतावलं जातंय पण त्यांच्या ‘गुणी’ असण्याची दखलच घेतली जात नाही. मुलं बदललीयत. (बिघडलियत असंही म्हणतात) असं ऐकू येत असतं.
तसं ते कुणालाही खरं वाटू शकतं. कारण ‘कॅमेरा’ फक्त मुलांवर लावलेला असतो. खरं तर माणसंच बदलतायत. मुलांशी बोलत असताना, त्यांच्यात बसलेला असताना मी त्यांच्या मनातल्या जाणीवांचा तळ शोधत राहतो. एखादा विषय सुरु करून मी ऐकत राहतो. खूप उत्तरं येतात. ती शांतपणे ऐकताना वाटतं इतकं घाबरण्यासारखं नाही. त्यांच्यासमोर आपण पर्याय ठेवले तर चांगल्या गोष्टी त्यांनाही तेवढ्याच आवडतात. शिस्त, स्वच्छता, टापटिप, वेळेचं महत्त्व त्यांनाही तेवढंच आहे. आदर करावा अशी माणसं त्यांनाही हवीच आहेत. माणूसकी, भूतदया, मैत्री, कृतज्ञता … त्यांना माहित आहे हे सगळं.
मी एकदा विचारलेलं, ‘नम्रता म्हणजे काय ?’ मला मिळालेली उत्तर छान होती. म्हणजे विचार करायला लावणारी होती ! काय होती ती?
‘नम्रता’ म्हणजे….
– आपण खूप ‘लहान’ आहोत हे माहित असणं.
– दुसऱ्यांना काही सांगण्याआधी दुसऱ्यांचं ऐकता येणं. – दुसऱ्यांकडे बघून थक्क होता येणं.
– आपल्याला दुसऱ्यापेक्षा जास्त कळतंय, असं न वाटून घेणं.
– दुसऱ्यांना मदत करावी असं वाटणं.
– दुसऱ्यांना देण्यासाठी वेळ असणं.
-माझीसुद्धा किंवा माझीच चूक असेल असं वाटणं.
-आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं, हे माहित असणं.
-समोरचा ‘ग्रेट’ आहे असं स्वत:ला सांगणं.
– दुसऱ्याकडे आकर्षित होणं.
– दुसऱ्यांच्या कामासाठी सदैव तयार असणं.
– हळुवार बोलणं.
– दुसऱ्याचे दोष शांतपणे दाखवता येणं.
– नजर वर करून न बघणं.
कमाल झाली ना! ‘नम्रता’ या एका भावनेचे इतके पदर मुलं सांगत होती. आणखी कितीतरी वेळ आम्ही ‘नम्रता’ समजावून घेत होतो. राम, लक्ष्मण, भरत, हनुमंत या सगळ्यांच्या साक्षी काढल्या आम्ही. पुराणातली माणसं डोंगराएवढी उंच असतात. ती सगळ्यांना कुठूनही दिसू शकतात. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड पुढे आले थोडे. आम्ही आमच्यातही ‘नम्रता’ शोधू लागलो.
आम्ही कधी भीती, सत्य, स्वच्छता, अहिंसा या विषयीही असंच खूप खूप बोललो. ‘स्वतःला घडविण्यासाठी आपला प्रत्येक निर्णय खूप विचार करून घ्यायला हवा…’ असंही ठरवू लागलो. बोलता बोलता सगळेच गप्प होऊन कधी अंतर्मुख होत होतो ते कळत नव्हतं!
२५. ‘आठवणींचा तास‘
स्वतःला खणून आतलं सत्व शोधण्याचा हा एक खेळच आहे. ‘सगळ्यांनी आपापल्या चांगल्या वाईट आठवणी सगळ्यांना सांगणं’ असं याचं स्वरूप. सुरुवातीला अवघड वाटणारा हा खेळ हळुहळू सगळ्यांना हवाहवासा वाटतो. एकतर दुसऱ्यांच्या आठवणी ऐकून, ‘अरे हे आपल्याला माहितच नव्हतं’ असं वाटतं. किंवा ‘केवढी गंमत !’ किंवा ‘ओह, असा प्रसंग कुणावरही येऊ शकतो!’ किंवा ‘मी त्या जागी असतो तर’ असं वाटू लागतं. मुलांची ‘जाण’ त्यातनं कळते. काय सांगावं, किती सांगावं, कसं सांगाव असं बरंच काही शिकायला होतं. हे काही कुठनं याचून नाही तर स्वतः च्या आयुष्यातलं असल्यामुळे ते माहित असतंच. पण ते सांगण्याची कौशल्यं तयार होतात. कुठे थांबावं, उत्सुकता वाढवून कुठे एकदम धक्का द्यावा, हसवणारं सांगावं की रडवणारं सांगाव असं बरंच काही.
कुणाला आजी आजोबां विषयी आठवतं, कुणाला आजारी असतानाचं आठवतं. कुणाला प्रवासातले किस्से सांगावेसे वाटतात. अपघात, जखमा, दुसऱ्यासाठी आलेलं रडू… असं अनेक प्रकारचं बोलणं ऐकताना आठवणींचा तास रंगला नाही असं कधीच होत नाही, झालं नाही. काल्पनिक गोष्टींचा आधार घेण्यापेक्षा स्वतः च्या मनातलं, आपलंच काही शोधण्याची सवय लावण्याची एक वेगळीच शक्ती यातनं मिळते!
२६. ‘पुस्तकांची सोबत‘
दर आठवड्याला तीन-चार तरी नवीन पुस्तकांची ओळख करून घ्यायची हे ठरलेलंच होतं. त्यातलं सगळ्यांना विचारून वाचायला घ्यायचं हे ही जणू ठरल्यासारखंच. कधी वर्तमानपत्रातला आवडलेला लेखही वाचला आम्ही. मुलं तर निवडून काही कविता आणत होती वाचायला. आई, वडिल, शाळा असे सुद्धा विषय होते त्या कवितांचे. मुलांची निवड सुंदरच असे. त्यांना खात्री असे “ही कविता सगळ्यांना आवडणार’ अशी! आताशा इंटरनेटवरून बरंच काही ‘डाऊनलोड’ करून “प्रिंट’ करून मुलं आणू शकतात. त्यातली त्यांनी निवडलेली कविता, निबंध.. छानच होते. मुलांबरोबर ‘साहित्य’ वाचता वाचता आम्ही चक्क मर्ढेकरांची ‘सौंदर्य आणि साहित्य’ ही समीक्षा सुद्धा चाळली.
‘कोसला’ वाचलं आणि मुलं वेडीच झाली. ‘असं पण लिहिता येतं?’ असं आश्चर्य होतं त्यांना. त्यातली ‘वगैरे’ ची भाषा आणि खिल्ली उडवणारी शैली त्यांना खूपच भावली. शिरीष पैं चे ‘हायकू’ वाचून मुलांनी तशा कविता स्वतः केल्या नसत्या तरच नवलं होतं. तीन ओळींची कविता, पण कवितेच्या गावात जाणारी ती एक जवळची वाट आहे खरी! दोन ओळी साध्या पण तिसरी मोठी गमतीची!!
रस्किन बाँडची The Blue Umbrella’ ही गोष्ट तर कितीतरी दिवस वाचत होतो आम्ही. त्यांच्या “बिन्या’ सोबत आम्ही सगळेच त्या निळ्या छत्रीतून फिरत होतो. कथा संपताना मात्र इतक्या उंचीवर पोहोचलो होतो की आभाळाची छत्री आता कायमची आमची झाली होती. ती फाटणारी नव्हती आणि चोरीला जाण्याचा तर प्रश्नच नाही. खरं तर त्याचं मोठ्ठ नाटक करण्याचाही प्रयत्न आम्ही मनातल्या मनात सुरु केला होता. करू ही कदाचित. (ही इच्छा अलिकडे २०१८ मध्ये पूर्ण झाली.)
मी सावित्रीबाई’ मध्ये चक्क सावित्रीबाई फुले आमच्याशी बोलत होत्या. पुस्तकांची काळाच्या पोटात शिरण्याची ही किमया आश्चर्यच आहे एक.
२७. ‘शिबीरातली शाळा‘
आम्ही मराठी बरोबर इंग्रजीच काय पण कधी कधी बंगालीसुद्धा वाचत होतो. वेगवेगळ्या भाषांच्या ‘लिपी’ विषयी बोलत होतो. भूमिती, भूगोल, इतिहास, विज्ञान आणि गणित हे सुद्धा आमच्या बोलण्यात होते. झालेल्या परिक्षांच्या प्रश्नांवर आम्ही बोलत होतो. अवघड प्रश्न एकत्र सोडवत होतो. इंग्रजी शब्दांच्या भेंड्या खेळतानाही धमाल येते हे अनुभवत होतो. समोरच्या पक्षाला जमणार नाही असं अक्षर शेवटी आणण्याचा प्रयत्न करीत होतो.
‘शब्द वेध’ सारखा दुसऱ्याच्या मनातला शब्द ओळखण्याचा खेळ खेळताना मजाच येत होती. अभिनयाचे खेळ चालू होते ते वेगळेच ! अनेक विषयांवर आम्ही ‘वाद-विवाद स्पर्धा’ घ्यायचो. मुलांची विषयांची तयारी बघण्यासारखी असे. खूप प्रभावीपणे स्वतः चा मुद्दा मांडून दुसन्याचा खोडून काढीत ती. शिबीरातल्या अनेक मुलांनी जिल्ह्यात, राज्यात अनेक कसल्या कसल्या परीक्षांमध्ये पुढे जाण्यात यश मिळवलेलं असे.
तो सगळ्यांसाठीच एक आनंदाचा भाग होता. शाळांच्या स्नेहसंमेलनामध्येही शिबीरातल्या मुलांनी स्वतःचे वेगळे कार्यक्रम यांची वाहवा मिळवलेली असायची. अर्थात या सगळ्या कार्यक्रमांचे प्रयोग नंतर आमच्या शिबीरातही झाले. मुलांच्या कल्पनेतून साकारलेले ते प्रयोग मलाही खूप आवडलेले. रात्री उशीरापर्यंत जागल्याशिवाय ‘घरचा अभ्यास’ पूर्णच होत नाही ही सगळ्याच मुलांची मोठी समस्या आहे. पालकांसाठी तर ती डोकेदुखीच आहे. दिवसभराचा वेळ शाळेसाठी देऊनही रात्रीसुद्धा मुलांना विरंगुळ्याचा वेळ मिळू नये अशी दक्षता घेणारी शाळेची यंत्रणा मला आताशा फार दुष्ट वाटू लागली आहे. मुलांना लिहिण्यासाठी एवढं काम दिलं जातंय की जणू ‘लिहिणं’ हेच त्यांचं जगणं होऊन जावं. आपल्याशी शाळा की शाळेसाठी आपण?
२८. झटपट नाटक‘
वर्षभराच्या शिबीरानंतर मुलं आता नाटकाचं व्याकरण चांगलंच जाणतात. फारशी चुकत नाहीत. रंगमंचावर स्वतः नेपथ्य उभं करतात. विषयानुरूप प्रवेश कल्पून एक सलग असा अनुभव ती देऊ शकतात. पात्र परिचयापासून ते शेवटपर्यंत ते नाटक पकड सोडणार नाही याचीही दक्षता ती घेताना दिसतात. प्रत्येक वेळी नवं काही करून बघावं हे सुद्धा त्यांना आता कळू लागलंय. प्रत्येक शिबीराच्या दिवशी पाच ते सहा तरी अशी ‘झटपट नाटक’ बघायला मिळणं म्हणजे केवढी मौज आहे हे शब्दात सांगता येणार नाही. त्यांना आव्हान वाटेल असे विषय मी देत राहतो. मुलं त्या विषयातून अतिशय सुंदर नाटक तयार करून सादर करतात. १५ ते २० मिनिटाच्या तयारीत सादर झालेली ही नाटकं कधी कधी तर इतकी चांगली होतात की
त्या ‘संहिता’ तयार करून जपून ठेवायला हव्यात असं वाटून जातं. तसे काही प्रयत्न करून काही संहिता तयार करणं सुरु आहे. त्या संहितांचं असं वेगळं पुस्तक होऊ शकेल. कधीतरी मी एका गटाला ‘पेन’ आणि दुसऱ्या गटाला ‘घड्याळ’ असे विषय दिले होते. खरं तर कुठल्याही दिशेला जाऊ शकतील असे विषय आहेत हे. पण यांचं सादरीकरण इतके सुंदर झालं.
‘पेन‘:
लेखकाचं घर … तिथं त्याच्या पत्नीचं आणि ह्याचं एका हिर्याच्या दुकानातल्या हि्र्याविषयी बोलणं…
दुकानदाराचं आणि त्याच्या बायकोचं गिन्हाईकांविषयी बोलणं …
दुकानाजवळ लेखकाचं घुटमळणं … बायकोला आवडलेला हिरा घेताना त्याला पडलेला प्रश्न…
अर्थात पैशांचा…हिरा आणि लेखकाचे पेन यांच्या किमतींच्या तुलनेचा प्रश्न निर्माण करून…
“पेन हे श्रेष्ठ आणि किंमती आहे कारण त्या पेनाने लिहिलेल्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन
अनेक वाचकांची आयुष्यं साकारली आहेत” असा शेवट!
‘घड्याळ‘:
एका वेळेचं भान नसणाऱ्या माणसाचं घर… त्या घरातल्या गजरच्या घड्याळाचे काटे एकमेकांशी बोलणं…तो माणूस त्या घड्याळाचा वारंवार अपमान करतो म्हणून घड्याळाने संपावर जायचं ठरवणं…
पण इंटरव्ह्यूला जाण्याची वेळ चुकेल म्हणून घड्याळाने पुन्हा आपला विचार बदलणं… ‘‘कुणी कसंही वागलं तरी आपण आपले काम करीत रहावे‘’असा घड्याळाचा स्वतःला दिलेला सल्ला!!
अशा खूप संहिता उदाहरण म्हणून देता येतील, ‘चंद्र‘ असा विषय दिला असताना मुलांबरोबर गच्चीवर खेळायला येणारा ‘चंद्र‘ फार गोड होता. अशा कितीतरी….
२९ ‘साखळी‘
१ मार्च २०१४ चा शनिवार हा या ‘सृजनाच्या वाटा’ १३-१४ चा शेवटचा शनिवार होता. आता मुलांच्या परीक्षा सुरु होतील. परीक्षा झाल्यावर पुन्हा आम्ही रोजच तालमींसाठी भेटणार आहोतच. या शनिवारी आम्ही ‘प्रतिष्ठान’ ऐवजी ‘असरोंडी’ या गावी एका डोंगराच्या माथ्यावर, उंचावर एकत्र जमलेलो. आमच्या शिबीरातल्या मिहिकाचं शेतघर हा आमचा आज रंगमंच होता. तिथं एक सुंदर, उंच दगडी स्मारक होतं. त्याच्या भोवती हिरवी पोपटी हिरवळ होती.
त्या वर्तुळाकार जागेत आम्ही खूप खूप खेळलो. मावळणारा सूर्य सगळ्यांनी एकत्र बघितला. तिथनं हाकेच्या अंतरावर मंदिर होतं. चाफ्याचं फुललेलं भलं मोठ्ठे झाड होतं. त्या दिवशी पालक, मुलं आम्ही खूप खेळलो. सगळ्यांनी हात हातात घेऊन मोठ्ठी साखळी केलेली. सगळ्यांनी एकत्र चांदण्या बघितल्या. ध्रुव स्पष्ट दिसत होता. मृग, रोहिणी, अश्विनी, कृतिका डोक्यावर होत्या. आम्ही एकत्र जेवलो. विनोद सांगितले, गप्पा मारल्या… एक संस्मरणीय रात्र होती ती!
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊ- पुन्हा गाऊ… नाचू…. वाचू! नाटक खेळू!!
३०. “एकच प्रश्न‘
‘शाती निकेतन’ ही सुद्धा एक ‘गोष्ट’ च झाली आहे आता. डॉ. अभय बंगांच्या आठवणीतली गांधी-विनोबांची ‘नई तालीम’ आता राहिली नाही. ‘ते ‘शिक्षणाचं जादुई बेट’ होतं. पण ते आता कुठं आहे?’ असा प्रश्न त्यांना पडला आहे. असं ‘सृजनाच्या वाटा’चं होऊ नये. त्या अशाच सर्वांना खुणावत रहायला हव्यात. मुलांचे पाय सतत तिथं वळायला हवेत. आजुबाजुच्या विरोधी वातावरणात ही आपली वाट टिकवून ठेवणं हा एकच प्रश्न फार महत्त्वाचा वाटतोय आज !
All rights reserved. ©Dr. Rajendra Chavan
No part of this blog may be reproduced, stored in a retrieval system, or transmitted in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording, or otherwise, without written permission from the author.
The opinions expressed in this blog are those of the author(s) and do not reflect the opinions of Rangabhasha or its Director(s), Member(s).
खूपच छान…वाचताना वाटलं की सतत वाचतच राहाव.
कवी कट्टा तर खूप आवडला…शांती निकेतन च स्वरूप S.V. club ला आल्यासारखं वाटल.
मला ते प्रत्यक्षात अनुभवता आलं नाही याची खंत वाटते, परंतु या लेखा द्वारे वाचता आलं याचा आनंद ही वाटतो…
खूपच छान…. वाचताना वाटलं की सतत वाचतच राहाव. कवी कट्टा तर खूप आवडला…
S.V.club च स्वरूप शांती निकेतन सारखं वाटू लागलं..
मस्त. असेच अजून अनुभव वाचायला खूप आवडेल.
धन्यवाद. नक्की आणखी सांगण्यासारखं महत्त्वाचं
एकमेकांस बोलत राहू.