मुलांची पहिली अभिव्यक्ती ‘चित्रकला’ – सुषमा पाध्ये

मुलांची पहिली अभिव्यक्ती ‘चित्रकला’

      एखाद्या घरात दोन चार वर्षांचे मूल राहते आहे, हे लगेच ओळखू येते, ते घरभर पसरलेल्या खेळण्यावरून आणि रंगवलेल्या भिंती जमिनीवरून. मुलांना खडू कागद, भिंती बोलावतच असतात त्याही जणू बाळाला अंगा खांद्यावर खेळवत असतात. रंगीत खडूच्या गिरगीटण्याने भिंती सजतात. आपल्याला त्यातून अवचित काही आकारही दिसू लागतात. मुलांच्या बोटांना काम हवे असते, वस्तू पकडून त्याला स्पर्श करून, वस्तू वापरून ते वस्तूची ओळख करून घेता असतात. अशाच ओळखीत केव्हातरी त्यांच्या हातात पेन, पेन्सिली रंगीत खडू पडतात. यातून काहीतरी व्यक्त होतेय हे त्यांचे त्या वस्तूबद्दलचे पहिले  शिकणेच असते. पुन्हा पुन्हा गिरगिटताना त्यांना आनंद होतो आणि तो ते मनमुराद लुटतात. खरेतर मुलाच्या अभिव्यक्तीचीच ती सुरुवात असते. 

     हळूहळू काहीतरी पाहिलेले, स्मरणात राहिलेले, गोष्टी-गाण्यात ऐकलेले, कुठेतरी व्यक्त करावेसे वाटू लागते. तेव्हा या खडू पेन्सिली त्यांच्या व्यक्त होण्याला साथ देतात. फार साधे सोपे माध्यम त्यांच्या  हाती असते. मनात आलेल्या कल्पना, भावना  ते सांगू शकतातच  असे नाही, पण  न सांगता येणाऱ्या अनेक भावना व्यक्त करायला मुलाला रेषांचे माध्यम सापडलेले असते, आणि मुख्य म्हणजे ते केव्हाही हाताशी असते. ते महागडे नसते, त्या वस्तूंच्या फुटण्या तुटण्याची काळजी मोठ्यांना नसते. काळजी असते ती फक्त पसारा होण्याची आणि भिंती खराब दिसण्याची.  

       साधारण  चार-पाच वर्षाच्या वयातील मुलांच्या रेषा आकारांना अर्थ प्राप्त झालेला असतो.  त्यांच्या  गिरगीटण्यालाला  त्याला नाव देता येऊ लागते. आपण मुलांशी संवाद साधला तर त्यांच्या मनातील  अर्थ आपल्याला उमगतो, आणि आपल्यालाही त्यांच्या कल्पनेतील ते आकार दिसू लागतात. भावना दिसू लागतात. समजलेल्या अनेक बाबी, जाणवलेल्या भावना रेषांतून व्यक्त होऊ लागतात. चित्रात गोष्टीतील वाघोबा असतो, कुठेतरी पाहिलेले झाड, डोंगर असतात, किंवा रागावलेले आई बाबा असतात, आवडते खाऊ आणि खेळणी असतात, न मिळणारी वस्तू असते. आपल्या इच्छाही ते चित्रातून व्यक्त करू शकतात.  गोष्टीत ऐकलेले प्रसंगही चित्रात दाखल झालेले असतात. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांशी नीट संवाद वाढवला तर आपल्या रेषांबद्दल ते नेमकेपणाने बोलायला शिकतात. 

      मुलांच्या या पहिल्या  अभिव्यक्ती माध्यामाला विकसित करणे हे मोठ्यांचे काम असते. बालशिक्षणात आणि पुढे प्राथमिक शिक्षणातही मुलांना शिकवण्यासाठी आणि मुलांचे आकलन तपासण्यासाठी चित्रकलेचा आधार घेता येतो. ऐकलेल्या गोष्टी गाण्यात काय आवडले, काय लक्षात राहिले  त्याचे चित्र काढायला मुलांना सांगावे. अशा चित्रांमधील आकार महत्त्वाचे नसतात, तर ऐकलेले मुलांच्या किती स्मरणात आहे, आणि त्यातील किती बारकावे ते दाखवू शकतात हे जाणून घेता येते. 

      मुले जग जाणून घेत असतात ते वस्तू पाहून आणि हाताळून. तसेच चित्रातून ते खूप मोठे जग जाणून घेतात. प्राणी पक्षी, जंगल, नदी, फुले, पाने अशा परिसरातील अनेक गोष्टी, त्यांचे रंग, आकार ते चित्रातून समजून घेतात. अगदी भूत राक्षस या कल्पनाही त्यांना चित्रातूनच भेटतात. भाषा, गणित भूगोल यातील अनेक संकल्पना शिकायलाही चित्रेच उपयोगी पडत असतात. जे प्रत्यक्षात दाखवता येत नाही, ते आपण मुलांना चित्रातूनच दाखवत असतो. म्हणूनच मुलांना संकल्पना किती समजल्या आहेत हे तपासण्याचा मार्गही चित्रकला असू शकतो. लहान चेंडू काढ, मोठा चेंडू काढ, उंच नारळाचे झाड काढ, फुलांचे एक लहान बुटके झाड काढ – अशा सूचना देऊन मुलांना चित्र काढायला सांगितले, की मुलाला ऐकलेले समजले का आणि लहान मोठी, उंच बुटकी अशी संकल्पना समजली का हे ही तपासता येते. संख्या समजून घेताना, मोजणी शिकताना वस्तूंच्या इतकीच चित्रे महत्त्वाची असतात. सराव आणि आकलन तपासणे दोन्ही त्यातून घडते. 

अशा अनेक  अनुभवांतून  चित्राचे कौशल्यही विकसित होऊ लागते. आकारांचे नेमके भान येऊ लागते, प्रमाण समजू लागते. कागदाच्या अवकाशाचा वापर हळूहळू उमगू लागतो. अगदी पहिल्या रेखाटण्या पासून ज्यांना प्रोत्साहन मिळाले आहे, सकारात्मक वातावरण मिळाले आहे, भरपूर सराव होत गेला आहे, अशा काही मुलांची मुलांची चित्रकलेशी चांगली गट्टीही जमते. मुलांच्या अभिव्यक्तीचे व शिकण्याचे  ‘चित्रकला’ हे पहिले माध्यम आहे, ते सहज फुलवत ठेवू. 

सुषमा पाध्ये (शिक्षण अभ्यासक व मार्गदर्शक) 

All rights reserved. ©Sushama Padhye

No part of this blog may be reproduced, stored in a retrieval system, or transmitted in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording, or otherwise, without written permission from the author.

The opinions expressed in this blog are those of the author(s) and do not reflect the opinions of Rangabhasha or its Director(s), Member(s).

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *