नाट्यगृहातील सफाई मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टी – कृतार्थ शेवगावकर

नाट्यगृहातील सफाई मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टी

नाटक ही एक कला आहे. परंतु ती चित्रकला, गायन यासारखी एकल कला नाही. एकटा माणूस ती पूर्ण स्वबळावर साकारू शकत नाही. कारण नाटक कला असण्याच्या बरोबर तो एक व्यवहार सुद्धा आहे. अनेकांचे हातभार लागल्याशिवाय नाटक कला आकाराला येत नाही. कल्पना एकाची असली तरी ती यशस्वीरित्या साकारण्यामागे अनेकांचे शारीरिक आणि मानसिक श्रम खर्ची पडत असतात.  म्हणूनच अख्खी क्रेडिट लिस्ट संपली तरी पुन्हा विशेष आभार या शिर्षकाखाली एक मोठी यादी नाटक करणारा गट देतो. नाटकाचा प्रयोग चांगला होण्यात हातभार असणाऱ्या परंतु कधीच नावे पुढे न येणाऱ्या लोकांचाही मोठा गट या संपूर्ण नाट्य व्यवहारात कार्यरत असतो. या नाट्य व्यवहाराची रचना समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. केंद्रस्थानी नाटक किंवा एखाद्या नाटकाचा प्रयोग आपण धरला आणि ‘या व्यवहारात येणारे घटक कोणते?’ असा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की नाट्यनिर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रमुख कलाकार, संगीतकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, इतर नट मंडळी यांना आपण एका कप्प्यात टाकू शकू. या सर्वांच्या कल्पनेतून नाटक आकाराला येतं. म्हणून जाहिरातीतही यांची नावे आपल्याला दिसतील. एका फळीत येतात प्रयोग लावणारे, तिकीट विक्री करणारे, जाहिरात करणारे आणि प्रयोगाचं आर्थिक गणित सांभाळणारे. एक गट आहे नाटकाला लागणारे दिवे, साउंड, माईक या गोष्टी पुरवणाऱ्या आणि त्याची व्यवस्था बघणाऱ्या लोकांचा.  त्यानंतर येतात सेट लावणारे, कपडेपट सांभाळणारे आणि नेपथ्य ऑपरेट करणारे. यांना रुळलेल्या भाषेत आपण बॅकस्टेज आर्टिस्ट असं म्हणतो. या सर्व व्यवहारातील नेहमीच दुय्यम किंवा तिय्यम समजला गेलेला, कधीच फार लक्ष दिला न गेलेला घटक म्हणजे नाट्यगृहाच्या साफसफाईची जवाबदारी असणारा सफाई कामगारचा घटक. नाट्य व्यवहारातील या घटकाकडून अपेक्षित वर्तन न झाल्यास इतर घटकांना बोंबाबोंब करताना आपण पाहतो.  ही बोंबाबोंब गैरसोयीमुळे दिलेली एक स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे. नाट्यगृहात असलेल्या अस्वच्छतेबद्दलच्या बातम्याही वर्तमानपत्रात अधून मधून येत असतात. तर या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण करूया.  हा लेख महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सरकारी नाट्यगृहातील सफाई कर्मचाऱ्यांशी बोलून, त्यांच्या मुलाखतीतुन तयार झाला आहे. 

नाट्यगृह व्यवस्था

मुळात शहरातली मोठी नाटयगृह या सरकारी वास्तू आहेत. सरकारच्या नजरेत इतर सरकारी बिल्डिंग सारखी आणखी एक बिल्डिंग यापलीकडे तिचे काही वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यामुळे कोणतेही नाट्यगृह बांधण्याच्या आधी जरी ते बांधण्याचा हेतू उदात्त वगैरे असला तरी नंतर ते व्यवस्थात्मक पातळीवर चालावताना सरकारी अधिकाऱ्यासाठी ती एक सरकारी बिल्डिंग असते. त्यामुळे बडा सरकारी अधिकारी किंवा मंत्री येईल तेव्हाच स्वतः जातीने उपस्थित राहून सरकार तिथली साफसफाई आणि स्वच्छता करते. अन्यथा बाकी काळासाठी सरकार साफसफाईचे टेंडर काढून ते एखाद्या Lowest किंमत Quote करणाऱ्या कंपनीवर ती जवाबदारी टाकून मोकळी होते. ही कंपनी साधारण सरकारी अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या माणसाचीच असते. नाट्यगृहात काम करणाऱ्या इतर यंत्रणा उदाहरणार्थ लाईट्स, साउंडस्, पार्किंग सुद्धा अशा पद्धतीने टेंडर जिंकलेल्या कंपनीच्या भरवशावर राबवल्या जातात. टेंडर जिंकलेली कंपनी साफसफाई करण्यासाठी पगारी माणसं नेमते. ही साफसफाई अपेक्षेप्रमाणे नसली तर कलाकार जेव्हा सरकारच्या नावाने खडेफोड करतात तेव्हा सरकार ‘आम्ही अमुक अमुक कंपनीला साफसफाईचं टेंडर दिलं आहे’ असे म्हणून मोकळे होतात. टेंडर जिंकलेली कंपनी नेमलेल्या माणसांना धारेवर धरते, त्यांचे पगार थांबवते किंवा कपात करते. प्रत्यक्ष साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार किती मिळतो, मिळतो की नाही, काम करताना पुरेशी आरोग्य विषयक काळजी घेतली जाते की नाही याविषयी सरकारला काही घेणेदेणे नाही. एखादा बरा ठेकेदार असेल तर तो बरी वागणूक देतो, एखादा देत नाही. पण ठेकेदार योग्य वागतोय की नाही यावर लक्ष ठेवणारी कोणती यंत्रणा अस्तित्वात नाही.  

मजबुरी 

साफसफाई करण्यासाठी कंपनीने नेमलेल्या माणसांमध्ये सगळ्या स्त्रिया आहेत. पुण्यातील नाट्यगृहांमध्ये तर 100% स्त्रिया आहेत.  महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा अगदी तुरळक कुठेतरी पुरुष दिसतील. पुरुष हे काम करत नाहीत का असे विचारले असता ‘ज्याची मजबुरी असते तो काम करतो, आता तुम्हीच ठरवा पुरुष का काम करत नाहीत ते’ असे एक ताई म्हणाल्या. यातल्या बऱ्याच एकल महिला आहेत. घरात त्या एकट्याच कमावत्या आहेत. मुलांची शिक्षणे त्यांच्या कामावर अवलंबून आहेत. 

नाट्यगृह की मंगल कार्यालय?

नाट्यगृहाबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारलं असता नाट्यगृहात नाटक कमी आणि मिटिंगस, वेगवेगळ्या राजकीय आणि इतर सभा, समारंभच जास्त होतात असे एका सफाई मैत्रिणीने मला सांगितले. ‘सभा घेण्यासाठी शहरात सभागृह आहेत. ‘नाट्य’गृह जर तुम्ही म्हणत असाल तर तिथे इतर गोष्टींपेक्षा नाटक अधिक व्हायला हवे.’ दुसरी एक जण म्हणाली. एक सफाई मैत्रीण तर ‘हे आम्हाला नाटयगृह कमी आणि मंगल कार्यालयच जास्त वाटते.’ असं म्हणाली. लग्नात जशी वऱ्हाडी मंडळी येतात आणि वाट्टेल तसा वापर करून खरकटं, अर्धवट खाल्लेली ताटं वगैरे तशीच टाकून निघून जातात तशीच परिस्थिती साधारण नाट्यगृहाची आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातल्या त्यात नाटकाला जरा बरा, स्वच्छतेची जाण असणारा प्रेक्षक येतो अशीही पुष्टी त्यांनी जोडली. 

आवडतं नाटक – चारचौघी

तुम्ही कधी नाटक बघता का या प्रश्नावर सर्वांनी एकमताने ‘हो’ असं उत्तर दिलं. अनेकदा काम असल्यामुळे सलग बघता येत नाही, त्यामुळे तुकड्यातुकड्यात आम्ही बघतो असं त्या म्हणाल्या. आत्ता सुरू असलेलं आवडतं नाटक विचारल्यावर जवळपास सगळ्याच नाट्यगृहांमधील सफाई ताईंचं आवडतं नाटक प्रशांत दळवी यांचं ‘चारचौघी’ होतं. या नाटकावर गप्पा मारताना कळलं की त्यांना या नाटकातील राजकारण पूर्ण आकळलं होतं. मी या नाटकाच्या प्रयोगानंतर तिकीट काढून नाटक पाहिलेल्या काही प्रेक्षकांसोबतही नाटकाच्या बाबतीत चर्चा केली होती. त्या प्रेक्षकांपेक्षाही या स्त्रियांना कळलेलं नाटक अधिक गहिरं होतं असं मला त्यांच्याशी बोलताना वाटून गेलं.

गुटखा आणि पिचकाऱ्या

नाट्यगृहात काम करताना अडचणी काय काय जाणवतात या प्रश्नावर तर खुप वेळ चर्चा झाली.  ‘गुटखा खाऊन थुंकणारे प्रेक्षक’ ही जवळपास सर्वच नाट्यगृहांच्या मधील सफाई ताईंची तक्रार होती. गुटख्याच्या थुंकी ताजी असेल तर त्याचा अतिशय उग्र आणि गलिच्छ वास येतो. खुर्चीच्या खाली, जिन्याच्या कोपऱ्यात, डस्टबिन मध्ये , भिंतींच्या कोपऱ्यात, दाराच्या मागे, पार्किंगमध्ये  अशा जागा गुटखा सराईत प्रेक्षकांनी शोधून काढलेल्या आहेत. ही थुंकी ओली असेल तर ती ओल्या फडक्याने हाताने पुसावी लागते. हे काम करताना अतिशय किळस वाटते. कधी एकदा काम संपवतो असे होऊन जाते असे एक ताई म्हणाल्या. टॉयलेट साफ करण्याचे काम ही याच कर्मचार्यांकडे असते. कितीही घट्ट कापड बांधले, मास्क घातले तरी पुरुषांच्या टॉयलेट मध्ये अतिशय घाण वास येतो असे सगळ्या सांगत होत्या. पुरुष प्रेक्षक गुटखा खाऊन मुतारीच्या भांड्यात थुंकतात. वाळलेले गुटख्याचे डाग फक्त ब्रशने निघत नाहीत. भांड्यात हात घालूनच कपड्याने ते पुसून घ्यावे लागते. कधी कधी गुटख्या सोबत थुंकलेली सुपारी भांड्यात अडकते. त्यामुळे केलेली लघवी पाईप मधून खाली जात नाही. तेव्हा या पुरुषांच्या लघवीने भरलेले भांडे आम्ही आधी कसेबसे रिकामे करतो.मग भांड्याच्या खाली असलेल्या भोकात हात घालून ते सुपारीचे तुकडे काढावे लागतात, असा विदारक अनुभव एका ताईंनी सांगितला. ते ऐकताना माझी मान खाली गेली होती. मी त्यांची माफी मागितली. गुटखा खाऊन थुंकणारा प्रेक्षक हा नाटकाला येणारा आहे की इतर कार्यक्रमाना येणारा प्रेक्षक आहे असे विचारले असता नाटकापेक्षा इतर कार्यक्रमांच्या वेळी जास्त त्रास होतो असे सांगून नाटकाला येणारा प्रेक्षकही थोड्या फार प्रमाणात असं वागतो असं त्यांनी सांगितलं.

डान्सबारचं गिऱ्हाईक नाट्यगृहाच्या दारात

सर्वाधिक त्रासदायक प्रेक्षक वर्ग कोणता असं विचारल्यावर पुण्यातील एका प्रतिष्ठित नाट्यगृहातील सर्व सफाई ताईंनी एकमताने ‘लावण्यांचे कार्यक्रम बघायला येणारा प्रेक्षक’ असे उत्तर दिले. लावण्यांचा कार्यक्रम असेल त्यादिवशी कामाचा भार चौपट होतो. महाराष्ट्रामध्ये डान्सबार वर बंदी टाकल्याच्या नंतर डान्सबार मध्ये जाणारी पुण्यातली सगळी गिऱ्हाईके एका प्रतिष्ठित (?) आणि नामवंत नाट्यगृहात होणाऱ्या लावण्यांच्या कार्यक्रमाकडे वळली असे एका अनुभवी कर्मचाऱ्याने सांगितले. बारमध्ये जाऊन दारू पिणे आणि मग डान्स बघायला नाट्यगृहात येणे असं रुटीन त्यांनी स्वतःचं लावून घेतलेलं आहे. लावण्यांच्या कार्यक्रमाला येणारे 90% प्रेक्षक हे दारू पिऊन येतात. प्रचंड दंगा करतात. एकतर सर्व सफाई कर्मचारी महिला आहेत. ‘लावण्यांचा कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही सर्व महिला कार्यक्रमाच्या अर्धा तास आधीच सर्व साफसफाईची कामे आवरून नाट्यगृहाच्या बाहेर जातो आणि कार्यक्रम संपल्यावर अर्धा तास नंतर पुन्हा आत येऊन प्रेक्षकांनी केलेली घाण पुन्हा साफ करतो.’ असे आम्हाला या सफाई ताईंनी सांगितले. 3 तासापूर्वी चकाचक केलेल्या फरशीवर आणि नाट्यगृहाच्या आवारात गुटख्याच्या पिचकाऱ्या, दारूच्या बाटल्या, सिगारेट बिड्यांची थोटके, तंबाखूची पाकिटे, अर्धवट खाल्लेले पाव, रॅपर, चहाचे कप, सांडलेला चहा असा यथेच्छ पसारा मांडलेला असतो. पुढील कार्यक्रम/प्रयोग सुरू व्हायच्या आत हे सगळं पुन्हा चकाचक करणे ही या कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. पुनः सर्व नाट्यगृह पार्किंगपासून ते रंगमंचामागील ग्रीन रूमपर्यंत स्वच्छ केले जाते. 

वर उल्लेखल्याप्रमाणे या सफाई कर्मचार्यांपैकी कोणीचमहा नगर पालिकेचा कर्मचारी नाही. यांचा पगार अनेकदा वेळेवर होत नाही. नेहमीच असे होते असे नाही परंतु कधी कधी पगार मिळायला उशीर होतो असेही एका नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोना काळात बॅकस्टेज आर्टिस्टला अनेकांनी आर्थिक आणि इतर मदत केली कारण सर्व कलाकार मंडळी त्यांना ओळखत होती. शिवाय बॅकस्टेज आर्टिस्ट संघटीत आहेत. रंगभूमी सेवक संघ नावाची संघटना त्यांच्यासाठी लढले. नाट्यगृहातले सफाई कामगार हे असंघटित आहेत. आम्हाला नाट्यगृह सुरू झाली नाहीत तोपर्यंत पगारही मिळाला नाही आणि संघटीत नसल्यामुळे नाटक व्यवहाराशी निगडित कोणाची मदतही आमच्या पर्यंत पोहचली नाही असे एका जणीने सांगितले. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही काही ठोस उपाय योजना नाहीत. आरोग्य विमा, आरोग्य तपासणी वगैरे सारख्या सुविधाही त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत. 

जवाबदाऱ्या काय काय?

टेंडर जिंकलेल्या कंपनीचा सुपरवायसर मी गेलो तेव्हा कोणत्याच नाट्यगृहात उपस्थित नव्हता. त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या विचारल्या असता पार्किंगपासून तिकिट खिडकी, नाट्यगृहाबाहेरचा पूर्ण परिसर, प्रेक्षकगृह, बाल्कनी, प्रेक्षागृहाबाहेरचा पॅसेज, टॉयलेट्स, रंगमंच, ग्रीनरूम्स , कलाकारांसाठीचे टॉयलेट्स हे सगळं रोजच्या रोज प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी साफ करण्याची जवाबदारी 7 ते 8 कर्मचाऱ्यांवर मिळून असते. हे काम शिफ्ट मध्ये चालते. सकाळी 8 ते 2 आणि दुपारी 2 ते रात्री 10 अशा साधारण दोन शिफ्ट असतात. कधी कोणी सुट्टीवर गेलं तर दोन्ही शिफ्ट मध्ये एकाच जणीला काम करायला लागतं. सफाईसाठी लागणारी साधने कोणती आहेत हे पाहायला मी गेलो असता अतिशय खालच्या दर्जाचे लोकल बनावटीचे नावही नसलेलं कोणतं तरी लिक्विड सोप मला दिसलं. साधनांची संख्या मात्र पुरेशी होती. 

नाट्यगृह व्यवस्थापनाबद्दल काय वाटते असं विचारलं असता नाट्यगृह व्यवस्थापन आणि आमचा काहीच संबध नाही असे सांगितले. या प्रश्नावर मला या सर्वांनी पुन्हा एकदा आम्ही याला मंगल कार्यालय का म्हणतो याची जाणीव करून दिली. ही फक्त मंगल कार्यालयासारखी एक बिल्डिंग आहे. इथे तुम्हाला तुमचे लग्न लावायचे असेल – म्हणजे प्रयोग करायचा असेल तर इथे काही भटजी, आचारी, फुलवाले, नेमून दिलेले आहेत, ते तुम्ही वापरू शकता. इथला पटत नसेल तर स्वतःचा पर्सनल भटजी, आचारी देखील घेऊन येऊ शकता अशी मजेशीर तुलना करून सांगितली. ज्यांना स्वतःच्या कार्यक्रमाचा दर्जा राखायचा असतो ते लोक स्वतः पैसे खर्च करून त्या कार्यक्रमाच्या काळापुरती साफसफाईपासून सर्वच बाबतीत स्वतः वेगळ्या खासगी कंपनीला अपॉइंट करतात. बाहेरील राज्यातील किंवा देशातील प्रेक्षक किंवा पाहुणे जेव्हा येणार असतात तेव्हा साधारण ही नीती अवलंबली जाते. 

तर ही होती नाट्यगृहाच्या सफाई कर्मचाऱ्याशी गप्पा मारताना नोंदवलेली काही निरीक्षणे. 

Leave No Trace तत्व

गिर्यारोहणाच्या जगात ट्रेक किंवा मोहिमेला जातात तेव्हा LNT (Leave No Trace) तत्व पाळले जाते. म्हणजे आपण निसर्गात ज्या ठिकाणी असू ती जागा सोडताना आपण तिथे आलो याचा कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. म्हणजे नंतर तिथे येणाऱ्या लोकांना ती जागा मुळात जशी होती तशीच्या तशी अनुभवायला मिळेल. हे LNT तत्व पाळण्यासाठी निसर्गात गेल्यावर काय करायचे आणि काय नाही याचे मार्गदर्शक नियमही आहेत. असे Leave No Trace तत्वाचे नियम नाट्यगृहाच्या वापराबाबतीत प्रेक्षक आणि कलाकारांसाठी तयार करायचे झाल्यास असे तयार करता येतील. 

१. थुंकणे टाळावे. 

२. कचरा कचरापेटीत टाकावा. 

३. टॉयलेट झाल्यावर पुरेसे पाणी टाकावे. 

४. नाट्यगृह आवारात कोणतेही मादक पदार्थांचे सेवन करू नये. 

५. ग्रीनरुम, रंगमंच आणि एकूणच नाट्यगृह यांची आपल्या स्वतःच्या घरासारखी काळजी घ्यावी. 

६. आपण नाट्यगृहात आणलेल्या वस्तू आपल्यासोबतच बाहेर जातील याची काळजी घ्यावी. 

खरंतर किती साधे नियम आहेत. शाळेत लहान मुले देखील हे नियम पाळतात. परंतु नाटकवेड्या महाराष्ट्रातील रसिक मायबाप वगैरे म्हणवून घेतलेल्या प्रेक्षकांना गेल्या अनेक दशकांपासून हेच नियम सांगावे लागताहेत आणि आज २०२२ मध्येही विनंत्या कराव्या लागत आहेत. 

सन्मानाने जगण्याचा आणि काम करण्याचा अधिकार

आपल्याला कलेचा आस्वाद घेता येतो कारण हे कर्मचारी राबत असतात. सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने काम करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना दिला आहे. आपली राज्यघटना स्वतःप्रत अर्पण करून हे अधिकार प्रत्येकाला मिळवून देण्याची जवाबदारी देखील आपण घेतली आहे. त्यामुळे आपलं बेताल वागणं कोणाच्या तरी सन्मानाने जगण्याच्या आड येतंय हे लवकरात लवकर प्रेक्षकांना समजायला हवे. या सफाई मैत्रिणींना सन्मानाने त्यांचे काम करता यायला हवे याची जवाबदारी आपण स्वीकारायला हवी. 

– कृतार्थ शेवगावकर 

(संपर्क : ९८२३९७४४००) 

प्रकाशन : कनक रंगवाचा दिवाळी अंक २०२२

All rights reserved. ©Krutarth Shevgaonkar

No part of this blog may be reproduced, stored in a retrieval system, or transmitted in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording, or otherwise, without written permission from the author.

The opinions expressed in this blog are those of the author(s) and do not reflect the opinions of Rangabhasha or its Director(s), Member(s).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *